दीनानाथ पुरस्कारप्रकरणी वक्तव्याने रंगकर्मीमध्ये नाराजी
‘लता मंगेशकर हे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्व असून नाटय़ परिषदेच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकदृष्टय़ाही आपण त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करणार नाही’, या नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या विधानामुळे नाटय़सृष्टीत नाराजी पसरली आहे. नाटय़कर्मीची मातृसंस्था मानल्या जाणाऱ्या नाटय़ परिषदेच्या अध्यक्षानेच स्वाभिमानाविरोधात भूमिका घेतली तर आम्हाला वाली कोण, असा नाराजीचा सूर नाटय़सृष्टीतून ऐकू येत आहे.
याबाबत मोहन जोशी यांना विचारले असता, ती आपली वैयक्तिक भूमिका असून, हा प्रश्न नाटय़ परिषदेच्या अखत्यारित येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
लता मंगेशकर यांच्याबद्दल आम्हालाही प्रचंड आदर आहे. मात्र तो लक्षात घेऊनही नाटय़ परिषदेने निर्मात्यांच्या बाजूने उभे राहायला हवे. याबाबत मोहन जोशी यांनी व्यक्त केलेले मत कदाचित त्यांचे वैयक्तिक मत असावे. कारण नाटय़ परिषदेच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच परिषदेचे मत मांडले जाईल, असे निर्माते प्रसाद कांबळी यांनी सांगितले.
यंदा मराठीत पुरस्कारासाठी एकही लायक नाटक आले नाही, या विधानाचा निषेध न करणाऱ्या माणसाबद्दल काय बोलणार, असा हताश सूर निर्माता दिलीप जाधव यांनी लावला.
मोहन जोशी यांनी एकदा नाटक उभे करून बघावे. म्हणजे त्यांना या विधानामुळे आम्हाला झालेल्या दु:खाची कल्पना येईल, असा टोलाही हाणला. तर मोहन जोशी यांचे हे वैयक्तिक मत असेल. नाटय़ परिषद नक्कीच निर्मात्यांच्या मागे ठाम उभी राहील, अशी आशा राहुल भंडारे यांनी व्यक्त केली.
मोहन जोशी यांनी हे विधान केवळ लता मंगेशकर यांना न दुखावण्यासाठी केले असण्याची शक्यता आहे. मात्र हे विधान करतानाच, ‘एवढय़ा मोठय़ा पुरस्कारापासून नाटय़सृष्टीला वंचित का बरे ठेवले,’ असा प्रश्न विचारण्यास ते विसरले असावेत, असे नाटककार अशोक पाटोळे यांनी म्हटले.
 मोहन जोशी नुकतेच अनेक वादांमधून बाहेर आले आहेत. त्यामुळे आणखी एखादे विधान करून वाद वाढवण्याची त्यांची इच्छा नसावी किंवा त्यांच्या या विधानामागे त्यांचीही काही गणिते असावीत, असा तिरकस टोलाही त्यांनी हाणला.

‘ते तर माझे वैयक्तिक मत’
लतादीदी आपल्यासाठी अत्यंत आदरणीय असून त्यांचा निषेध वगैरे करणे चूक आहे, हे आपले मत अजूनही कायम आहे. मात्र हे मत नाटय़ परिषदेच्या अध्यक्षाचे नसून आपले वैयक्तिक मत आहे. नाटय़ परिषदेने लक्ष घालावे, एवढी काही ही बाब नक्कीच गंभीर नाही. नाटय़ परिषद अशा कोणत्याही गोष्टींमध्ये रंगकर्मीच्या मागे कशी उभी राहील! रंगकर्मीच्या खरेच काही समस्या असतील, तर मात्र आम्ही त्या नक्कीच सोडवू.     – मोहन जोशी.