News Flash

दोन पावलांत त्यांनी मृत्यूला मागे टाकले..

मायलेक दोन पावलेच पुढे गेले असावेत इतक्यात कारखान्यात भीषण स्फोट घडला

आग झोपडीच्या दिशेने पुढे सरकते हा अंदाज घेत तुषारने लगबगीत आईला घेऊन बाहेर पळ काढला.

मायलेक बचावले; साकीनाका दुर्घटनेत झोपडीबाहेर पडताच सिलिंडर स्फोट

साकिनाका, खरानी मार्गावरील मखरीया कम्पाऊंडमधील फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीतून तुषार पवार आणि त्याची आई थोडक्यात बचावले. कारखान्याला लागूनच असलेल्या झोपडीत पवार कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यास आहे. पहाटे चारच्या सुमारास घाबऱ्या स्वरात तुषारला उठवले. डोळे चोळत तुषार झोपडीबाहेर पडला तेव्हा फरसाण कारखान्याला आगीने कवेत घेतले होते. आग झोपडीच्या दिशेने पुढे सरकते हा अंदाज घेत तुषारने लगबगीत आईला घेऊन बाहेर पळ काढला. मायलेक दोन पावलेच पुढे गेले असावेत इतक्यात कारखान्यात भीषण स्फोट घडला आणि त्यानंतर आगीचे तांडव सुरू झाले. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर दोघे मागे वळून बघेपर्यंत आगीने त्यांच्या झोपडे गिळले होते. डोळ्यांसमोर चाळीस वर्षांचा संसार राख होताना पाहून प्रचंड वेदना झाल्या. आईने हाय खाल्ली. सध्या तिला नातेवाईकांच्या घरी ठेवले आहे, असे तुषारने सांगितले.

दीड वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले तेव्हापासून आम्ही दोन भाऊ आईचे आधार बनलो. मोठा भाऊ तेजस विमानतळावर कंत्राटी कामगार आहे. रविवारी तो रात्रपाळीत होता. त्यामुळे मी आणि आई दोघेच घरी होतो. वडलांच्या निधनानंतर तीची दृष्टी कमी झाली होती. त्यातून सावरते न सावरते तोच आगीने आम्हाला रस्त्यावर आणले. आता आयुष्याला नव्याने सुरूवात करावी लागेल, असे खासगी कंपनीत मजुरी करणारा तुषार सांगत होता.

या जागेचे मुळ मालक मखारीया यांचा पुर्वी मोजे बनविण्याचा कारखाना होता. त्यात तुषारचे वडील तानाजी मजुरी करत. विश्वासू कामगार म्हणून मखरीया यांनी पवार कुटुंबाला राहाण्यासाठी कम्पाऊंडमध्ये जागा दिली होती. त्यावर सुमारे दिडशे चौरस फुटांची झोपडी उभारून हे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्य करत होते. मखारीया यांनी काही वर्षांपुर्वी कारखाना बंद करून या जागेत गोदामे उभी करून ती भाडय़ाने दिली. दोन वर्षांपुर्वी रमेश भानुशाली यांनी ही जागा फरसाण कारखाना सुरू करण्यासाठी मखारीया यांच्याकडून भाडय़ाने घेतली होती.

पहाटे आग लागल्यानंतर शेजारील कारखान्यांमधील कामगारांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. बादलीने पाणी ओतण्याचे काम काही काळ सुरू होते. मात्र आग विझण्याऐवजी आणखी पसरू लागली तेव्हा अग्निशमन दलाला बोलावण्यात आले, असे शेजारील कारखान्यातील मजूर प्रविण ठाकूरने सांगितिले.आग कंपाउंडच्या मध्यभागी लागली. त्यामुळे आत फसलेल्या मजुरांना बाहेर पडणे अशक्य होते. कारखान्याच्या शौचालयाजवळ सात मृतदेह आढळले, अशी माहिती जलाल खान यांनी दिली. मखारीया कम्पाउंड शेजारील गाळ्यात खान यांचा व्यवसाय आहे. शनिवारी संध्याकाळीच फरसाण बनवण्याचा कारखाना  बंद झाला होता, त्यात रविवारी सुट्टी असल्यामुळे कामगारांना सुट्टी होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा तर्क खान यांनी व्यक्त केला. आग विझवणे, आत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे ही प्राथमिकता होती. मजुरांच्या मृत्यूप्रकरणी तूर्तास अपघाती मृत्यूची नोंद घेतली जाईल. आग कशी लागली हे स्पष्ट होताच जबाबदारी निश्चित करून त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. पहाटे साडेचारच्या सुमारास साकिनाका पोली घटनास्थळी पोहोचले होते. मात्र तोवर आग आटोक्याबाहेर गेली होती, असे  साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

अत्यंत दाटीवाटीने वसले कारखाने, वाहतुक कोंडीमुळे नेमक्या ठिकाणी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. या परिस्थितीतही अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग याच कम्पाऊंडमध्ये मर्यादीत ठेवली. याच कम्पाऊंडला लागून अन्य कारखाने आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कानखान्याचा पोटमाळा कोसळला. बाहेर पडण्यासाठी अन्य मार्ग नव्हता. त्यामुळे मजूर आतल्या आत कोंडले गेले आणि त्यांचा मृत्यू ओढवला.

प्रभात रहांगदळे, मुख्य अग्निशमनदल प्रमुख

खरानी रोडसह साकिनाका भागातील अनधिकृत बांधकाम व कारखान्यांविरोधात पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिका अधिकारी या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. पालिका अधिकारीही त्यात दोषी आहेत का याचा तपास व्हावा.

ईश्वर तायडे, माजी नगरसेवक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:12 am

Web Title: mom son success to save life from major fire broke out at a farsan shop in sakinaka
Next Stories
1 मुंबईत विद्युत वाहनांचा मार्ग खडतरच!
2 ‘जीटी’ रुग्णालयात पायांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र विभाग
3 रोषणाईमुळे प्रदूषणाचा ‘अंधार’
Just Now!
X