पीएमसी खातेदार संघटनेचा आक्षेप

मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील (पीएमसी) खातेदारांना आपल्या खात्यातील रक्कम काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना या गैरव्यवहारातील आरोपी के. जॉय थॉमस, गीता सिंग यांच्या बँक खात्यात पगार कपातीच्या नावाखाली १० हजार रुपये जमा होत आहेत. खातेदारांच्या संघटनेने त्यास आक्षेप घेतला असून बँकेचे राष्ट्रीयीकृत बँकेत विलीनीकरण व्हावे, अशी मागणी केली आहे.

निखिल व्होरा, बिस्तु शेठ, सुधा चंद्रन आदी खातेदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक रवींद्र वायकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांविषयी निवेदन दिले. सर्वसामान्य खातेदारांबरोबरच अनेक सोसायटय़ा, व्यावसायिकांचे कोटय़वधी रुपये बँकेत अडकले आहेत, १९ खातेदारांचा मृत्यू झाला आहे. आरोपींची मालमत्ता विकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊनही रिझव्‍‌र्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात त्यास विरोध केला. ही बँक राष्ट्रीयीकृत बँकेत विलीन करावी, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत रिझव्‍‌र्ह बँक अधिकारी व संबंधितांची बैठक घ्यावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.