स्वत: वाटप करण्याची प्रथा बंद करण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट, गणवेश, दप्तर अशा ८५ शालोपयोगी वस्तूंचे वाटप शाळांतून करण्याऐवजी त्याचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात जमा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्या ‘थेट अनुदान योजने’ अंतर्गत हा निर्णय घेतल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये नमूद केले आहे. २०१९-२० या वर्षांकरिता शिक्षणासाठी २७३३ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. गतवर्षांपेक्षा ही तरतूद १६४.४२ कोटी रुपयांनी वाढवली आहे.

पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, दप्तर, वह्य़ा, रेनकोट, जेवणाचा डबा आदी ८५ शालोपयोगी वस्तू मोफत दिल्या जातात. परंतु आता या वस्तू शाळेमधून देण्याऐवजी याचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. आगामी शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय झाल्याचे म्हटले असले, तरी राजकीयदृष्टय़ा अनेक वाद उद्भवण्याची शक्यता आहे. या वस्तूंसोबतच शाळांमधून पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी लेखनासाठी दुरेघी, चौरेघी वह्य़ा आणि पावसाळी सँडलही या वर्षांपासून देण्यात येतील. शालोपयोगी वस्तूंसाठी प्राथमिक स्तरासाठी १६.८७ कोटी रुपये आणि माध्यमिकसाठी २.८२ कोटी रुपये अर्थसंकल्पात राखीव ठेवण्यात आले आहेत.

विज्ञान कुतूहल भवन

शहरातील एकच विज्ञान कुतूहल भवन उपलब्ध असल्याने अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. म्हणून पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये प्रत्येकी एक विज्ञान कुतूहल भवन उभारण्यात येणार आहे. यामध्ये खगोल, भूगोल आणि आरोग्य विषयांवरील चलत प्रतिकृतींचा समावेश असेल. यासाठी अर्थसंकल्पात १.२० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

अन्य वैशिष्टय़े

’ पालिका विद्यार्थ्यांसाठी क्रीडा व संगीत अकादमी

’ २५ लघुविज्ञान केंद्रासाठी – ६६ लाख रुपये

’ ई ग्रंथालयासाठी १.३० कोटी रुपये

’ शाळांच्या पुनर्बाधणी दुरुस्तीसाठी २०१ कोटी रुपये

’ पालिका शाळांमध्ये ६ हजार ६६६ सीसीटीव्ही