अनधिकृत चाळी, इमारती उभ्या करायच्या, त्यामधील घरे विकायची, बक्कळ पैसा कमवायचा आणि लोकांचा जीव धोक्यात घालून कमावलेल्या पैशाचा वाटा मातोश्रीवर पोहचवायचा, असा उद्योग ठाण्यात शिवसेनेने वर्षांनुवर्षे केला, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी रात्री डवलेनगर येथील काँग्रेसच्या एका जाहीर मेळाव्यात केला. शिवसेनेचे ठाण्यातील तीनही आमदार अनधिकृत चाळी आणि इमारती उभारण्यात मग्न आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
ठाणे शहर काँग्रेस कमिटीमार्फत आयोजित काँग्रेस पक्षाच्या वचनपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राणे उपस्थित होते. यावेळी सभेला झालेल्या अल्प उपस्थितीमुळे संतापलेल्या राणे यांनी स्थानिक नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
शिवसेनेवर टीकेचे ‘प्रहार’ करताना ठाण्यातील बेकायदा बांधकामाचे पैसे मातोश्रीवर पोहचल्याचा उल्लेख करून राणे यांनी खळबळ उडवून दिली. ठाण्यातील अनधिकृत घरांमध्ये राहाणाऱ्या रहिवाशांचे कैवारी म्हणून शिवसेनेचे आमदार वावरत आहेत. परंतु ही घरे बांधली कुणी याचे उत्तर शिवसेना नेते देतील काय, असा सवाल राणे यांनी केला. शिवसेनेने शहरात बेकायदा बांधकामे उभी केली. त्यामधून पैसा कमावला,वरती पोहचविला, अशा शब्दात राणेंनी सेनेवर हल्ला चढवला.
महापालिकेची तिजोरी आपल्या ताब्यात आहे म्हणून स्थानिक नेते खूश आहेत. मात्र, तिजोरीपेक्षा येथील सत्ता ताब्यात येईल यासाठी मेहनत करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी टक्का घसरला
मुंबईतील मराठी टक्का शिवसेनेमुळे कमी झाला, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी विकू दिल्या जाणार नाहीत, असे शिवसेना नेते मोठय़ा आवेशात सांगायचे. प्रत्यक्षात मनोहर जोशींनीच गिरणीची जमीन विकत घेऊन त्यावर इमले उभे केले. मुंबईतील मराठी टक्का शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे कमी झाला आणि ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही पुढे तेच होणार, असे भाकीतही वर्तविले.