रवी पुजारी टोळीतील दोघांच्या अटकेनंतर उलगडा

कोटय़वधी रुपयांची रोकड हवालामार्गे परदेशात तसेच देशभरात पाठविण्याची पद्धत तशी फार जुनी आहे. परंतु हवालामार्गे व्यवहार करताना प्रामुख्याने दुबईला फोन जातो आणि तेथून अन्यत्र जिथे रोकड हवी असते तेथे ती पाठविली जाते. परंतु नोटाबंदीनंतर हवाला व्यवहारावर कमालीची गदा आली. इतकेच नव्हे तर रोख रकमेवर गुप्तचर यंत्रणेनेही लक्ष वळविल्याने आता संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी ‘हवाला’चा मार्ग बदलला आहे. आता दक्षिण आफ्रिकेमार्गे हवाला व्यवहार होत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात बाहेर आली आहे.

हवालाच्या नव्या पद्धतीनुसार आता दक्षिण आफ्रिकेतील विशिष्ट व्यक्तीला फोन केला जातो. ही व्यक्ती इराण किंवा लंडनमधील आपल्या सूत्राला फोन करते. त्यानंतर तेथून दुबईत फोन लावला जातो. त्यानंतर हवाला व्यवहाराची पूर्तता होते, अशी माहिती रवी पुजारी टोळीतील गुंडांच्या अटकेनंतर उघड झाली आहे. या गुंडांपैकी कमलुद्दीन आणि असरानी या दोन आरोपींनी हवालाच्या बदलत्या मार्गाची माहिती दिली आहे. ही माहिती नवी असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दुबईतील हवालाच्या अनेक मार्गाचा पोलिसांनी बंदोबस्त केल्यामुळे ही पद्धत वापरली गेल्याचेही सांगितले जाते. कमुलद्दीन खंडणीची रक्कम गोळा करीत, असे आणि ती असरानीच्या हवाली करीत असे. त्यानंतर ती रक्कम मुंबईत एका ठरावीक व्यक्तीला दिली जायची. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील व्यक्तीशी संपर्क साधला जात असे. तेथून लंडन वा इराणमार्गे दुबईमध्ये राजूभाईशी संपर्क होत होता, अशी माहितीही या तपासात उघड झाली आहे. दुबईत असलेल्या रवी पुजारीला खंडणीची रक्कम अशा पद्धतीने हवालामार्गे मिळत असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. मात्र रवी पुजारी खरोखरच दुबईमध्ये असल्याबद्दल शंका व्यक्त करताना या अधिकाऱ्याने तो सध्या ऑस्ट्रेलियात असल्याचे सांगितले. हवालाच्या या नव्या मार्गाबाबत गुप्तचर यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून याबाबत दुजोरा मिळाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीनंतर हवालाचा मार्ग बदलण्यात आल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला. आता पुन्हा ‘हवाला’चा जोरदार व्यवहार सुरू झाल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. कोटय़वधी रुपयांचा हवाला व्यवहार नोटबंदीनंतरही सुरू असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.