News Flash

अंधेरी-वांद्रे परिसरात ‘मर्कटलीलां’त वाढ

साधी माकडे व लंगूर जातीची माकडे पाच-सहाच्या झुंडीने अन्नाच्या शोधार्थ शहरात येतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर कचऱ्यात सापडलेला बिअरचा टीन तोंडाला लावणारे माकड.

अन्नाच्या शोधात शहरी भागाकडे धाव; माकडे जखमी होण्याच्या प्रमाणात वाढ

नागरिकांकडून दिले जाणारे अन्नपदार्थ, कचऱ्यात सापडणारे खाद्यपदार्थ यांमुळे माकडांचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वेस ओलांडत मानवी वस्तीत बिनधास्त वावरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या ‘मर्कटलीला’ उद्यानालगतच्या परिसरातच नव्हे तर अगदी अंधेरी, वांद्रे या ठिकाणीही दिसू लागल्या आहेत. परंतु, शहरातील वावर त्यांच्या जीवावरही बेतत आहे. ‘शहरी’ जीवनाची सवय नसलेल्या अनेक माकडांचा विजेच्या धक्क्य़ाने अथवा वाहनाखाली येऊन किंवा कुत्र्यांच्या हल्ल्यात करुण अंत होत आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या उपनगरांत माकडे बऱ्याचदा दिसत. परंतु, आता त्यांचा वावर अगदी वांद्रे-अंधेरीतही सुरू झाला आहे. साधी माकडे व लंगूर जातीची माकडे पाच-सहाच्या झुंडीने अन्नाच्या शोधार्थ शहरात येतात. वन विभागाच्या मुंबईतील नियंत्रण कक्षात माकडांनी इमारतीत अथवा परिसरात प्रवेश केल्याच्या दररोज सात ते आठ तक्रारी येत आहेत. उद्यानालगतचे उपनगरांमधील नागरिक त्यामुळे हवालदिल झाले आहेत.

जंगलातील माकडे अन्नाच्या शोधार्थ नागरी वस्तीत शिरकाव करत आहेत. तर नागरी वस्त्यांमधील उकिरडा हा या माकडांसाठी अन्नाचा मोठा स्रोत झाला आहे. जंगलात फळांची झाडे तुलनेत कमी आहेत. त्यात माकडांना उद्यानात व उद्यानाबाहेर नागरिकांकडून चविष्ट अन्न उपलब्ध होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या बोरिवली, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, ठाणे या उपनगरांत माकडे नेहमी दृष्टीस पडतात. सकाळी उद्यानात अथवा उद्यानालगतच्या परिसरात नागरिक फिरायला येतात तेव्हा सोबत घरातील उरलेले अन्न किंवा खास तयार केलेले पदार्थ, फळेही माकडांसाठी घेऊन येतात. एखादे माकड दिसले की त्याला ते खाऊ घालतात. मात्र यामुळे माकडांना आयते पदार्थ खाण्याची सवय लागते. या आयत्या अन्नाची सवयच त्यांचा शहरातील वावर वाढविण्यास कारणीभूत ठरते आहे.

आता माकडे मानवी वस्तीला सरावली असून खाद्यपदार्थ दिसले की हिसकावून खातात, अशा तक्रारी नागरिक करू लागले आहेत. एका वन्यप्राणी मित्राने तर कचऱ्यात सापडलेल्या बिअरच्या टिनमधील उरलेली बिअर पिणाऱ्या माकडाचे गमतीदार छायचित्रही टिपले आहे. माकडांचा शहरातील वाढता वावर त्यांच्या जीवावर बेततो आहे. शहरात अपघातात किंवा विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या माकडांना वन अधिकारी पकडतात. मात्र, त्यांच्यावर उपचार करून पुढे काही काळ त्यांची काळजी घेण्याकरिता शासकीय उपचार व निवासी केंद्रच नाही. त्यामुळे त्यांना जंगलात सोडले जाते. परंतु, अन्य माकडे त्यांना स्वीकारत नाहीत. पुन्हा शहरात येतात.

हनुमानाचा अवतार म्हणून..

कचरा आणि अन्न हे माकडे शहरात येण्यामागचे मूळ कारण आहे. त्यामुळे त्यांना अन्न देणापासून नागरिकांना रोखले पाहिजे. तरच त्यांचा शहरातील वावर कमी होईल, असे ‘पॉज’ संस्थेचे सुनीश कुंजू यांनी सांगितले. तर अनेकदा माकड म्हणजे हनुमानाचा अवतार म्हणून नागरिक त्यांना अन्न देतात, मात्र त्यामुळे समस्या गंभीर होऊ लागली आहे, असे या माकडांवर उपचार करणारे ‘रॉ’ संस्थेचे पवन शर्मा यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 12:41 am

Web Title: monkey migrate from national park to andheri and bandra in search of food
Next Stories
1 घातक मांजाचा वापर सुरूच
2 मुंबईकरांची ‘वायफाय’शी नाळ तुटलेलीच
3 विधानसभा आश्वासन समितीच्या बैठकांना सचिवांच्या दांडय़ा
Just Now!
X