मोनो रेल अद्यापही सुरू झालेली नसली तरीही मोनोच्या प्रवासी भाडय़ाने मुंबईकरांना आधीच दिलासा दिला आह़े  सर्वच सार्वजनिक परिवहन सेवांचे भाडे वाढत असताना मोनो रेल्वेचे भाडे तुलनेत सर्वात कमी राहणार आहे. मोनो सुरू झाल्यानंतर त्याचे भाडे किमान ५ रुपये आणि कमाल १९ रुपये राहणार असून त्यात तब्बल १० वर्षे वाढ करण्यात येणार नाही. याबाबतच्या प्रस्तावावर राज्य सरकारने बुधवारी शिक्कामोर्तब केले.
देशातील पहिल्याच मोनो रेलच्या गेल्या सहा माहिन्यापासून चाचण्यावर चाचण्या घेतल्या जात आहेत. पहिल्या टप्यात चेंबूर ते वडाळा तर दुसऱ्या टप्यात संत गाडगेबाबा चौक, सात रस्त्यापर्यंत मोनो धावणार आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने आजवर उपनगरीय रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त होता. मात्र बेस्ट व अन्य परिवहन सेवांच्या पाठोपाठ आता उपनगरीय सेवाही महाग होत आहे. मेट्रो रेल्वे नेमकी कधी सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच ही मेट्रो चालविणाऱ्या रिलायन्सने आधीच भाडेवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे त्या तुलनेत मोनोचा प्रवास मात्र फारच किफायतशीर ठरणार आहे. मोनो रेलेच्या भाडेपत्रकास राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या तीन किमीसाठी ५ रुपये, तर त्यानंतरच्या दोन किमीसाठी ७ रुपये असे भाडे असेल. दर १० वर्षांनी भाडय़ाची पुनर्रचना होईल, त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिले आहेत.

मोनोचे भाडेपत्रक
अंतर (किमी)     भाडे (रु.)
०-३                     ५
३-५                    ७
५-७                   ९
७-१०                  ११
१०-१५                १४
१५-२०               १५
२० पेक्षा अधिक       १९