चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मोनोरेल प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सुरक्षा प्रमाणपत्राची प्रक्रिया आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात या मार्गाची पाहणी होऊन मोनोरेलला हे सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या टप्प्यात मोनोरेलची सेवा चेंबूर ते वडाळा या ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरू होणार आहे. नंतर दुसऱ्या टप्प्यात वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या ११.२ किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल सुरू होईल. मोनोरेल सुरू करण्यापूर्वी त्यास सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक आहे. या सुरक्षाविषयक तपासणीसाठी महाराष्ट्र सरकारने माजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नेमणूक सुरक्षा प्रमाणपत्र प्राधिकरण (अभियंता) म्हणून केली आहे. त्यानुसार मोनोरेलला हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने सर्व कागदपत्रांसह शुक्रवारी अर्ज दाखल केला. मोनोची स्थानके, त्यावरील उपकरणे, वीजपुरवठा, कारडेपोची माहिती, सिग्नल यंत्रणा, अग्निशमन व्यवस्थेसह इतर सुरक्षा यंत्रणा आदींची तपशीलवार कागदपत्रे अर्जासोबत सादर करण्यात आली आहेत. त्याआधी खासगी सल्लागारांकडून सर्व यंत्रणा समाधानकारकपणे कार्यान्वित असल्याची चाचणी व अहवाल घेण्यात आला होता. मोनोरेल सेवेत दाखल होण्यापूर्वीचे हे शेवटचे सुरक्षा प्रमाणपत्र आहे. ते मिळाले की मुंबईकरांना मोनोरेलमधून प्रवास करता येईल, असे ‘एमएमआरडीए’चे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.
*सकाळी ५ ते मध्यरात्री १२ या वेळेत मोनो धावेल.
*चेंबूर ते वडाळा हे सरासरी पाऊण तासांचे अंतर मोनोरेलमुळे अवघ्या १९ मिनिटांत कापता येईल.