News Flash

चार तासांनंतर सुरू झालेली मोनो रेल्वे पुन्हा ठप्प

आज सकाळी सहा वाजता भक्ती पार्कजवळ एक मोनो रेल्वे अडकली होती.

Mono railway : आज सकाळी सहा वाजता भक्ती पार्कजवळ एक मोनो रेल्वे अडकली होती. ही रेल्वे ओढून आणण्यासाठी दुसरी रेल्वे पाठविण्यात आली होती.

पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या खोळंब्याच्या घटना मुंबईकरांसाठी नित्याची बाब झाली असताना यामध्ये आता मोनोरेल्वेचीही भर पडली आहे. आज सकाळपासून मोनो रेल्वेवर बिघाडांचे सत्र सुरू आहे. काही वेळापूर्वीच तब्बल चार तासांच्या खोळंब्यानंतर मोनो रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा भक्ती  पार्क स्थानकाजवळच मोनो रेल्वे बंद पडली आहे. आज सकाळी सहा वाजता भक्ती पार्क स्थानकानजीकच तांत्रिक बिघाडामुळे एक मोनो रेल्वे बंद पडली होती. त्यामुळे चेंबूर ते वडाळ्यादरम्यानची मोनोरेलची वाहतूक तब्बल चार तास बंद होती. मात्र, आता नव्याने समस्या उद्भवल्याने वाहतुकीचा खोळंबा होणार आहे.

सकाळी सहा वाजता भक्ती पार्कजवळ एक मोनो रेल्वे अडकली होती. ही रेल्वे ओढून आणण्यासाठी दुसरी रेल्वे पाठविण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर मोनो प्रशासनाकडून हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते.अखेर चार तासांच्या प्रयत्नानंतर तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात यश आले. त्यानंतर बिघाड झालेल्या मोनो ट्रेनला दुसऱ्या ट्रेनद्वारे खेचून वडाळ्याच्या दिशेने रवाना करण्यात आले.
वीजपुरवठा बंद पडल्याने मोनो ‘ब्लॉक’
भक्ती पार्क स्थानकाजवळ लाल आणि हिरव्या रंगाची मोनो रेल्वे समोरासमोर अडकून पडल्या होत्या सुरूवातीला दोन्ही मोनो रेल्वेंना या अवस्थेत पाहून त्यांच्यात धडक झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, थोड्याचवेळात या मोनो रेल्वेंची धडक झाली नसून तांत्रिक कारणामुळे या मोनोरेल अडकल्याचे स्पष्ट झाले. काल रात्री चेंबूर स्थानकानजीक टायर फुटल्यामुळे हिरव्या रंगाची मोनो ट्रेन अडकली होती. बिघाड दुरूस्त झाल्यानंतर ही ट्रेन यार्डात परतत होती. मात्र, भक्ती पार्क स्थानकाजवळ या ट्रेनमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड उद्भवल्यामुळे ही ट्रेन बंद पडली. दरम्यान, या ट्रेनच्या चालकाला ट्रेनमधून खाली उतरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  गेल्यावर्षी मार्च महिन्यातदेखील वीजपुरवठा बंद पडल्याने भक्ती पार्क स्थानकाजवळ मोनोरेल दोन स्थानकांच्या मध्येच अडकली होती. त्यावेळी मोनोरेल चालकासह त्यातील ११ प्रवाशांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले होते. क्रेनच्या साह्य़ाने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते.

कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आटगाव-खर्डी स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारी सकाळी कल्याण-कसारा अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे सीएसटीहून कसाऱ्याकडे जाणारी डाऊन लोकल आटगाव-खर्डी दरम्यान खोळंबली. त्यानंतर सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरूस्त करण्यासाठी आसनगाव ते कसारा दरम्यानची वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या बिघाडाचा फटका बसला आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होईपर्यंत लांबपल्ल्याच्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2016 8:35 am

Web Title: mono railway stuck at bhakti park due to technical fault
Next Stories
1 गोरेगावच्या कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग; अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी
2 आठवले विरुद्ध मायावती : नवा राजकीय संघर्ष
3 भ्रमणध्वनी चोरीची तक्रार ऑनलाइन!
Just Now!
X