News Flash

मोनो सेवा पुन्हा रखडली

मोनोला गेल्या सहा महिन्यांपासून सुटय़ा भागांची चांगलीच चणचण जाणवत आहे.

प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने रखडणारी मोनो रेल्वे सोमवारी सकाळी पुन्हा बंद पडली. वीजपुरवठय़ातील तांत्रिक बिघाडामुळे म्हैसूर कॉलनी ते भारत पेट्रोलियम दरम्यान मोनो रेल्वे बंद पडली. अडकलेल्या प्रवाशांची सुटका झाली असली तरी चेंबूर ते वडाळा मार्गिकेवरील वाहतूक दिवसभर बंद ठेवावी लागली.

सोमवारी सकाळी १०.१५ वाजता चेंबूरहून निघालेली मोनो रेल्वे म्हैसूर कॉलनी आणि भारत पेट्रोलियमच्या दरम्यान बंद पडली. विद्युतरोधक तुटल्याने मोनो बंद पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली. प्रवाशांची सुटका करण्यासाठी बंद पडलेल्या मोनोशेजारच्या रुळावर दुसरी रेल्वे आणण्यात आली. बंद पडलेल्या मोनोमधील प्रवाशांना दुसऱ्या मोनोमध्ये नेण्यात आले. प्रवाशांची सुटका केल्यानंतरही या पट्टय़ातील वाहतूक बंद ठेवण्यात आली. वडाळा संत गाडगे महाराज चौक या दरम्यानची वाहतूक २३ मिनिटांच्या वारंवारितेने सुरू होती. मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा २०१४ मध्ये कार्यरत झाला, तर या वर्षी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा टप्पाही कार्यरत झाला. मोनोची सेवा वारंवारिता कमी   असली तरी अतिवृष्टी दरम्यान ४ सप्टेंबरला एकाच दिवशी तब्बल १५ हजार प्रवाशांनी मोनोचा वापर केला होता. मात्र मोनो सेवेतील अडचणी, वारंवार बंद पडण्याचे प्रसंग यामुळे एकूणच मोनोला प्रवाशांकडून पुरेसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

मोनोला गेल्या सहा महिन्यांपासून सुटय़ा भागांची चांगलीच चणचण जाणवत आहे. त्याच वेळी सुटय़ा भागांच्या खरेदी निविदेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागवावी लागली होती. मागील वर्षी डिसेंबरमध्ये मोनोचे संचालन मलेशियाच्या स्कोमी बीएचडी इंजिनीअरिंग या कंपनीकडून काढून घेऊन ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्वत:कडे घेतले होते. सुटय़ा भागांचा तुटवडा गेल्या सहा महिन्यांत सातत्याने मोनोला जाणवत आहे. स्कोमी कंपनीने सुटय़ा भागांच्या उत्पादकांची जुनी देणीही दिली नसल्याने सुटय़ा भागांच्या उत्पादकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यास वेळ लागल्याचे कारण त्या वेळी प्राधिकरणाने दिले होते.

मोनोची रखडपट्टी

गेल्याच महिन्यात ४ ऑगस्टला करंट कलेक्टर शूजअभावी मोनोची सेवा तीन दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती.

 ३० जुलैला भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनीदरम्यान एक झाड मार्गिकेवर झुकल्यामुळे तासभर वाहतूक थांबवण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:00 am

Web Title: mono service reinstated akp 94
Next Stories
1 मुलाखतीला बोलावून तरुणीवर बलात्कार
2 ‘आयटम’ बोलून पळणाऱ्याला महिलेनं पाठलाग करुन पकडलं, विलेपार्ल्यातील घटना
3 माहूलमध्ये नवीन स्थलांतर नाही, आहेत त्यांनाच पर्याय द्या : हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश
Just Now!
X