मुंबईतल्या चेंबूर भागात दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर एकाचवेळी आमनेसामने आल्याची धक्कादायक घटना रात्री ९ च्या सुमारास घडल्याची माहिती मिळते आहे. मात्र मोठा अपघात मुळीच झालेला नाहीये. मोनोरेलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती. मात्र तातडीनं दुसरी मोनो पाठवून सगळ्या प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ मोनो रेलची वाहतूकही ठप्प झाली होती. मात्र आता ही वाहतूकही पूर्ववत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. मात्र या प्रकारामुळे मोनो रेलच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका मोनोमध्ये बिघाड झाल्यानं दुसरी मोनो पाठवण्यात आल्याचं एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

चेंबूर स्थानकाजवळ दोन मोनोरेल एकमेकांच्या समोर आल्या. मात्र सुदैवाने कोणताही अपघात घडला नाही. त्यानंतरचा अर्धा तास मोनोची दारं बंद असल्यामुळे प्रवासी घाबरले होते. अर्ध्या तासानंतर सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बेत बिघडल्यानं त्यांना स्ट्रेचरवरून रूग्णालयात नेण्यात आलं आहे. अत्याधुनिक यंत्रणा असतानाही दोन मोनो रेल्वे एकमेकांसमोर कशा काय आल्या असा प्रश्न विचारला जातो आहे. तसंच या प्रकाराकडे मोनोरेल प्रशासनानं गांभिर्यानं पाहावं अशीही मागणी करण्यात येते आहे.