पाणी साचल्याने मंदावलेली रेल्वे पारसिक बोगद्याच्या धोक्याने थबकली

देशभर साजऱ्या होत असलेल्या योगदिनी अनेक नेते औटघटकेच्या योगप्रात्यक्षिकात मग्न असतानाच मंगळवार पहाटेपासून मध्य आणि हार्बर रेल्वे प्रवाशांना मनस्तापयोगालाच सामोरे जावे लागले. सोमवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने चुनाभट्टी, कुर्ला, मानखुर्द, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, ठाणे येथे रेल्वेमार्गात पाणी साचल्याने तसेच दादर स्थानकात मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने मंदावलेली रेल्वे पारसिक बोगद्यावरील संरक्षक भिंतीवर दरड कोसळल्याने पुरती थबकली. विशेष ब्लॉक घेऊन ‘पारसिक’ची दुरुस्ती आटोपण्यास सायंकाळचे पाच वाजले. मात्र या काळात तब्बल २५३ सेवा रद्द झाल्याने प्रवाशांसाठी मंगळवार हा अमंगळवारच ठरला. नाही. दिवा स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा विस्फोट झाला. नालेसफाई, पावसाळी कामे पूर्ण झाल्याचे रेल्वे प्रशासनाचे दावे पहिल्याच पावसाने फोल ठरविले आहेत.

सोमवारचा दिवस पावसाच्या प्रतीक्षेत गेल्यानंतर मंगळवारी पहाटेपर्यंत मुसळधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रुळांवर पाणी तुंबले. याच वेळी भरती होणार असल्याने सिग्नल बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन किमान सेवा चालू राहाव्यात यासाठी कुर्ला आणि कळवा कारशेडमधून नेहमीपेक्षा कमी गाडय़ा बाहेर काढण्यात आल्या.

या गाडय़ांच्या मदतीने धिम्या मार्गावरील सेवा चालवून जलद मार्गावरील काही सेवा मध्य रेल्वेने रद्द केल्या. त्यामुळे नेहमीपेक्षा बऱ्याच विलंबाने गाडय़ा धावत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले. त्यातच मडगावच्या दिशेने निघालेल्या मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला. ही गाडी दादर येथेच खोळंबून राहिली. त्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतुकीवर परिणाम झाला.

त्याचवेळी पारसिक बोगद्यावरील संरक्षक भिंतीवर दरड कोसळल्याने ही भिंत धोक्यात आली. या बोगद्यावर बेसुमार अनधिकृत बांधकामे झाली आहेत. इतकेच नव्हे तर संरक्षक भिंतीला लागून रस्ताही बांधण्यात आला आहे! मंगळवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील माती आणि त्यावरील कचरा संरक्षक िभतीपर्यंत कोसळला. त्यामुळे या भिंतीचा पाया खचला आणि बोगद्यावरील भिंत त्यामुळेही खिळखिळी झाली.

ही गोष्ट स्थानिक नेते, ठाणे महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर या बेकायदा बांधकामांकडे आजवर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अखेर संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास या बोगद्यावरील धोकादायक झालेली संरक्षक भिंत हटवली गेली. पाचच्या सुमारास अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक संथगतीने वाहतूक सुरू झाली.

मेट्रोतही तांत्रिक बिघाड

मुंबईच्या मेट्रो सेवेतही तांत्रिक दोषांमुळे एक ट्रेन रद्द करावी लागली. तसेच, एकामागोमाग मेट्रो ट्रेन खोळंबल्याने दोन मेट्रो ट्रेन तीन मिनिटे उशिराने धावत होत्या, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वेच्या जन-संपर्क अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, कोणत्या मार्गावरच्या ट्रेन बाधित झाल्या व नेमका कोणता दोष उद्भवला याबाबत माहिती न मिळाल्याने बिघाडामागचे कारण समजू शकलेले नाही.

मुंबईचे रस्तेही जागोजागी वाहनांनी तुंबले..

मंगळवारी पावसाने जोर कायम ठेवल्याने शहरात काही भागांत वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई शहरातून उपनगरात जाण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग प्रमुख मानले जातात. मात्र पावसामुळे रस्त्यावर काही प्रमाणात पाणी साचल्याने आणि रेल्वे मार्गावर गोंधळ झाल्याने सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत तर सायंकाळी ५ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली. यात टॅक्सीचालकांच्या आंदोलनाचा धसका घेतल्याने अनेक खासगी वाहतूकदार रस्त्यावर उतरल्यानेही कोंडीत वाढ झाली होती. सकाळी जेमतेम चाळीस मिनिटे पावसाच्या सरी कोसळूनही उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दहिसर या भागांत काही प्रमाणात पाणी साचले होते. त्याचा रस्ते वाहतुकीला फटका बसला. अनेक मार्ग निसरडे झाल्याने चालकही खबरदारी म्हणून वाहन कमी वेगाने चालवत होते. त्यामुळे सायंकाळी गोरेगाव, मालाड, कांदिवली, आणि दहिसर भागांत वाहतूक कोंडी झाली. तसेच सायंकाळी साडेसातच्या सुमारास वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शन भागांत, पूर्व द्रुतगती, पी.डी’मेलो रोड,  लोअर परळ, एल्फिन्स्टन पूल, अंधेरी-घाटकोपर रोड येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनाच्या रांगा लागल्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे हाल कायम होते.

तीन तासांचा ब्लॉक

  • पारसिक बोगद्यावरील धोका टाळण्यासाठी रेल्वेने दुपारी १.३५च्या सुमारास एका तासाचा ब्लॉक घेतला.
  • ठाणे महापालिकेने सुरू केलेले हे काम तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालले.
  • या दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.
  • उपनगरीय सेवांप्रमाणेच दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसटी येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ाही काही काळासाठी रद्द करण्यात आल्या.

दिवा येथे उग्र आंदोलन

गाडय़ा अतिशय विलंबाने आणि संथगतीने धावत असल्याने गाडय़ा गर्दीने खच्चून भरल्या होत्या. धिम्या मार्गावर १५ ते २० मिनिटांच्या अंतराने येणाऱ्या गाडीत शिरणेही प्रवाशांना कठीण झाले होते. दिवा स्थानकात बराच वेळ गाडी न आल्याने या स्थानकात हजारो प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यातच जलद मार्गावरून दोन गाडय़ा धडधडत गेल्याने या प्रवाशांच्या मनात रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप होता. हा हजारोंचा जमाव रुळांवर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनालाही जानेवारी २०१५च्या दिवा आंदोलनाची आठवण झाली. मात्र प्रवाशांनी संयम राखत केवळ ‘रेल्वे रोको’ करून जलद गाडय़ांना दिवा स्थानकात एका दिवसासाठी तात्पुरता थांबा देण्याची मागणी केली. रेल्वेने या स्थानकाजवळ लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबवत प्रवाशांना त्यातून प्रवास करण्याची मुभा दिली.

पाऊस थांबला म्हणून!

पहिल्याच मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या डोळ्यांवरची झापडेही उघडली आहेत. सोमवारी पश्चिम रेल्वेला धोबीपछाड घालणाऱ्या पावसाने मंगळवारी मध्य रेल्वेला शह दिला. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने आणखी बिघाड उघडे पडले नाहीत.