महिन्याच्या बचतीतील मोठा हिस्सा उपचारांवर खर्च

‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पावसाळ्यासोबत येणारी मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांची साथ मध्यमवर्गीयांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासोबत कुटुंबाचे अर्थकारणही कोलमडून पडू लागले आहे. घरातील कर्ता व्यक्ती आजारी पडल्यास कामावर खाडे होऊन त्याचा मासिक उत्पन्नावर परिणाम होतोच; शिवाय औषधोपचाराच्या खर्चामुळे बचतीतील मोठा हिस्साही कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

मुंबईच्या आडव्यातिडव्या पसाऱ्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे. पावसाळ्यात कुजणारा कचरा, साचलेले पाणी, तुंबलेली गटारे, पाण्याची फुटलेली पाइपलाइन, डासांचा प्रादुर्भाव अशा अनेक कारणांमुळे आजारांचा फैलाव वाढतो. पावसाळ्यात डेंग्यू, लेप्टो, मलेरिया, कावीळ, विषमज्वर या साथीच्या आजारांबरोबरच ताप, सर्दी, खोकला यांसारखे छोटे-मोठे आजार डोके वर काढू लागतात. घरातील एका सदस्याला या आजाराची लागण झाली तरी, अवघे कुटुंब मानसिक ताणाखाली येते. हे आजार संसर्गजन्य असल्याने पुरेशी काळजी घेऊनही घरातील अन्य सदस्य अंथरुणाला खिळतात. या सगळ्या घडामोडींत कुटुंबांचे अर्थकारणच कोलमडून जात आहे. डॉक्टरांची फी, औषधांचा खर्च, पथ्यपाणी सांभाळण्यासाठी होणारा खर्च या साऱ्या गोष्टींचा कुटुंबांच्या मासिक बचतीवर मोठा परिणाम होत आहे.

अमित जिराफे (वार्षिक उत्पन्न – दहा लाख रुपयांच्या आसपास)

एचडीएफसी बँकेत काम करणारे अमित जिराफे जुलै महिन्यात साथीच्या आजाराने त्रस्त होते. सुरुवातीचे काही दिवस घरात उपचार केल्यानंतर त्यांना तीन दिवसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मलेरियाची चाचणी आणि रक्ततपासणी केल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. अमित यांच्या घरात त्यांची दोन लहान मुले आणि पत्नी असा परिवार आहे. या आजाराच्या उपचारात रक्ततपासणीसाठी ७५० तर इतर चाचण्यांकरिता ११०० रुपये खर्च करावे लागले. आजारपणात अमित यांच्या सुमारे १० सुट्टय़ा झाल्या. त्यांच्या गैरहजेरीत अनेक कार्यालयीन कामे अडून राहिली. दुसरीकडे त्यांच्या आजारानंतर त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीलाही तापाची बाधा झाली. त्यामुळे तिच्या औषधपाण्यावर खर्च झाला तो वेगळा. अवघ्या १० दिवसांत दोघांच्या आजारावर ५ ते ६ हजारांचा खर्च झाला.

प्रज्ञा वाळिंबे (वार्षिक उत्पन्न – १ लाख रुपयांच्या आसपास)

माहीम येथे राहणाऱ्या प्रज्ञा वाळिंबे यांचे पती रिक्षाचालक आहेत. महिन्याला एक लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न असलेल्या वाळिंबे दाम्पत्याला १६ वर्षांचा एकुलता एक मुलगा आहे. गेल्या आठवडय़ात तो तापाने फणफणला. ताप खूप वाढल्यामुळे त्याला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याला सलाइन लावण्यात आले आणि तातडीने रक्ततपासणी आणि साथीच्या आजारांची तपासणी करण्यात आली. सुदैवाने ताप गंभीर स्वरूपाचा नव्हता. मात्र फक्त सलाइन लावण्यासाठी दोन हजार रुपये मोजावे लागले. त्यानंतर औषधावरही एक हजार रुपयांच्या आसपास खर्च करावा लागला. महिनाअखेर असल्यामुळे तातडीने पैसे मिळविणे कठीण होते. उधारउसनवारी करून खर्च भागावावा लागला. मुलाच्या आजारपणात प्रज्ञा यांनाही नोकरीत सुट्टय़ा घ्याव्या लागल्या.

दीप्ती साठे (वार्षिक उत्पन्न ३-५ लाख रु.)

माटुंगा येथे राहणाऱ्या दीप्ती साठे यांना मागील महिन्यात मलेरिया झाला होता. त्या वडिलांसोबत राहतात. वडिलांना अर्धागवायू झाल्यामुळे त्यांच्या देखभालीची जबाबदारी त्यांना पेलावी लागते. ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय करणाऱ्या दीप्ती यांना मलेरियामुळे महिनाभर काम करणे शक्य झाले नाही. औषधे आणि चाचणी करण्यात त्यांचे दहा हजारांहून अधिक रुपये खर्च झाले. ‘या महिन्यात काम आल्यानंतर ते पुढच्या महिन्यात येईलच असे नसते,’ अशा शब्दांत त्यांनी हतबलता व्यक्त केली.

मलेरिया, डेंग्यु, लेप्टो, काविळीच्या रक्तचाचणीसाठी दीड ते दोन हजार खर्च येतो. तर काविळीची लक्षणे असल्यास लघवीच्या तपासणीसाठी २०० ते ३०० रुपये खर्च येतो. तापाबरोबर खोकलाही अधिक असेल तर छातीचा एक्स-रे काढण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. तापाचे नेमके निदान होत नसल्यास ‘ब्लड कल्चर’ चाचणी केली जाते. यासाठी दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मलेरिया, डेंग्यू, काविळ या आजारात सीबीसी चाचणी  केली जाते.  यासाठी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत खर्च येतो.

डॉ. एल.एम.सामंत, संदीप यादव (राज्य पॅथलॅब अध्यक्ष)