News Flash

गॅलऱ्यांचा फेरा : पावसाळी प्रदर्शनांचीही आबादानी!

पावसाळ्यात कुठली प्रदर्शनं असावीत, याच्या ठरावीक चाकोरीत खासगी गॅलऱ्या यंदा अडकलेल्या नाहीत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेली बॉम्बे आर्ट सोसायटीची निराळीच दिसणारी इमारत वांद्रे पश्चिमेला रंगशारदा नाटय़गृहाच्या अगदी समोर आहे. या प्रशस्त इमारतीतल्या, तीन मोठी दालनं भरणाऱ्या उद्घाटनपर प्रदर्शनात शक्यतो मिळतील ती उत्तमोत्तम चित्रं मांडून ‘बॉम्बे स्कूल’चं दर्शन घडवण्यात आलं होतं, तर २७ जुलै रोजी संपलेलं दुसरं प्रदर्शन ‘व्यक्तिचित्रण : परंपरा आणि वर्तमान’ या विषयावरचं होतं. तिथंच आता येत्या १९ ऑगस्टपासून ‘पावसाळी प्रदर्शन’ सुरू होणार आहे. त्यासाठी राज्यभरातल्या प्रत्येक कला-महाविद्यालयाकडून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण यंदा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचीच चित्रं मागवण्यात आली आहेत आणि ही अट पाळून महाविद्यालयांनी चार-पाच विद्यार्थ्यांची निवडक चित्रं पाठवावीत; त्यातूनही चित्रं निवडून ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चं पावसाळी प्रदर्शन सिद्ध होईल, अशी योजना आहे. या तपशिलाचा आपणा प्रेक्षकांशी तसा काहीच संबंध नसला तरी आपल्यासाठी यातून मिळणारी बातमी निराळी आहे.. मुंबईत ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ आणि ‘नेहरू सेंटर’ खेरीज आणखी एक मोठी संस्था विद्यार्थ्यांचं पावसाळी प्रदर्शन भरवते आहे, म्हणजे आपल्याला अधिक तरुणांची चित्रं-शिल्पं यंदा पाहायला मिळणार आहेत!

पावसाळ्यात विद्यार्थ्यांचीच कलाप्रदर्शनं भरवण्याची कल्पना मुंबईत मुरली, त्याला आलेला ‘बॉम्बे आर्ट सोसायटीचं पावसाळी प्रदर्शन’ हा नवा अंकुर आहे. बाकी, ‘मुंबईतली आकारानं सर्वात लहान गॅलरी’ असण्यात धन्यता मानणारी खारच्या ‘१००, कल्पना इमारत, बारावा रस्ता, चित्रकार धुरंधर मार्गाजवळ’ या पत्त्यावरली ‘प्रदर्शक आर्ट गॅलरी’सुद्धा ‘विद्यार्थी विशेष’ नावाचं प्रदर्शन टप्प्याटप्प्यानं पावसाळाभर भरवते. यंदा ११ जुलैपासून ‘मेटलक्राफ्ट’ हा टप्पा प्रदर्शक आर्ट गॅलरीत पार पडला, तर सध्या (सहा ऑगस्टपर्यंत) ‘निसर्गदृश्यं’ हा टप्पा पाहता येणार आहे. राहुल तिके, परेश ठुकरुल सिबी सॅम्युएल, किरण गुंजकर यांच्यासह एकंदर २२ विद्यार्थ्यांची कामं इथं आहेत (तरी, सांगली/ कोल्हापूरचे विद्यार्थी यंदा नाहीत! यंदा या टप्प्यात तरी मुंबई, पनवेल, ठाणे, नाशिक, औरंगाबाद इथले विद्यार्थी आहेत). म्हणजे थोडक्यात, ‘टीचभर’ म्हणावी अशी ही गॅलरीसुद्धा भरपूर संख्येनं विद्यार्थ्यांची चित्रं पावसाळ्यात मांडते. अन्य खासगी गॅलऱ्या मात्र विद्यार्थ्यांना थेट संधी न देता जरा तरुण- पण कलाबाजारात गेली काही र्वष जम न बसलेल्या- अशा दृश्य कलावंतांची प्रदर्शनं पावसाळ्यात योजत असत. यंदा ती प्रथा जवळपास बंदच झालेली दिसते.. पण त्याऐवजी कुलाब्याच्या (आर्थर बंदर रोडवरल्या) ‘साक्षी गॅलरी’नं तुलनेनं स्वस्त अशा ‘प्रिंट’चं प्रदर्शन ठेवलं आहे. त्याबद्दल ‘गॅलऱ्यांचा फेरा’ंमध्येच ३० जूनच्या अंकात लिहिलं होतं. ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’ या नव्या खासगी कलादालनानं ज्या तिघा तरुण चित्रकारांना यंदा- म्हणजे या गॅलरीच्या पहिल्याच- पावसाळ्यात ज्या तिघांचं प्रदर्शन भरवलं आहे, ते तरुण असले तरी अगदीच नवोदित नाहीत. प्रताप मोदी यांची लाकडावर (वूडब्लॉक) कोरलेली मोठ्ठी कामं आणि त्यांचीच काही लाकूड-ठसा मुद्राचित्रं (वूडकट्स), सुजीत एस. एन. यांची रंगचित्रं आणि मधू दास यांनी मिश्र साधनांनी केलेली ड्रॉइंगवजा चित्रं यांतून ‘स्तब्धता आणि गती यांमधली स्थिती’ दाखवणारं हे प्रदर्शन असल्याचं गॅलरीचं म्हणणं आहे.. भायखळ्याच्या राणीबागेपासून काही अंतरावर, डॉ. आंबेडकर मार्गावरच पण ‘न्यू ग्रेट ईस्टर्न मिल्स’ या भूतपूर्व कापडगिरणीच्या जागी ही नवी गॅलरी आहे. ‘गॅलरी केमोल्ड’नंदेखील यंदा, या बडय़ा गॅलरीत पूर्वी कधीच काम न दाखवलेल्या एका तरी तरुण कलावंताला दर पावसाळ्यात संधी देण्याचा आपला रिवाज मोडला आहे.. पण त्याऐवजी इथं शीतल गट्टाणी या अमूर्त चित्रकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रकर्तीचं निराळंच काम ३ ऑगस्टपासून खुलं होणार आहे, ते ज्याची चर्चा व्हावी असंच असणार आहे!

म्हणजेच, पावसाळ्यात कुठली प्रदर्शनं असावीत, याच्या ठरावीक चाकोरीत खासगी गॅलऱ्या यंदा अडकलेल्या नाहीत. फक्त नवेच किंवा अगदी तरुण आणि माहीत नसलेलेच चित्रकार या गॅलऱ्यांत असतील, तर चित्रखरेदीदार फिरकतच नाहीत असा गेल्या काही वर्षांतला अनुभवही या सांधेबदलामागे असेल, पण बदल झाला आहे आणि तोही ठीकच आहे.

हेही आणि तेही

नवे किंवा कधीच कुठल्याही गॅलरीत चित्रं न दाखवलेले चित्रकार आणि जुने किंवा प्रेक्षकांच्या परिचयाचे चित्रकार यांचं एकत्रित प्रदर्शन किमान पावसाळ्यात तरी भरवणं, हा यावर उपाय आहे. तो यंदा यशस्वीपणे योजला आहे, ‘क्लार्क हाऊस’ नावाच्या- व्यावसायिक (किंवा खासगी मालकीचं) नसलेल्या कलासंस्थावजा दालनानं. ‘ग्वादेलोप ओरिएंटल’ या नावाच्या या प्रदर्शनात ‘आजच्या संदर्भात पौर्वात्यवाद’ हा एक वैचारिक धागा आहे. पण विरेश्वर भट्टाचारजी यांची ‘काश्मीर- १९९० चे दशक’ या शीर्षकाची तीन चित्रं यापेक्षा थोडी निराळी दिसतात. बाकीच्या प्रदर्शनात, स्वत:चा विचार ‘पौर्वात्य/ पाश्चात्त्य’ या मोजपट्टीवर करण्यापासून ते ‘पौर्वात्य’ वस्तूंकडे आजच्या नजरेनं पाहणं आणि त्यांच्या गतकाळाबद्दल तटस्थ राहूनही भावनांना निराळी वाट देणं, आजच्या संदर्भात आफ्रिकेचा विचार करताना ‘पौर्वात्यतावादी’ वैचारिक दृष्टिकोन लागू करणं, अशा हेतूंची चित्रं/ मांडणशिल्पं/ शिल्पं इथं आहेत.

‘गतकाळाबद्दल तटस्थ राहूनही भावनांना निराळी वाट देणं’ हे वाचायला जरा विचित्र वाटेल. पण सॅव्हिया लोपेझ यांची इथली कलाकृती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ही चित्रकर्ती मूळची वसईची. मराठी भाषेच्या ख्रिस्ती परंपरेची शाखा जागती ठेवणाऱ्या टापूतली. आजी-पणजीपासूनचं ‘लुगडं’ आता कोणी नेसणार नाही- ते ‘मेलं’ आहे- निरुपयोगी गतवस्तूसारखंच ते आता घरात उरणार आहे- हे सॅव्हियानं ओळखलं. मान्यही केलं. पण याच चित्रकर्तीची आजी ही पंचक्रोशीत कोणी ख्रिस्तवासी झाल्यास त्यांच्यासाठी निरोपाची गाणी म्हणायला जाते. गेलेल्या व्यक्तीची स्तुती, गुणवर्णन, तुझी आठवण येईल असा संदेश असं त्या निरोपगाण्यांचं स्वरूप असतं. ही प्रथासुद्धा कदाचित बंद होऊ शकते. म्हणून सॅव्हियानं आजीकडून, या मेलेल्या लुगडय़ासाठी दोन निरोपगीतं रचून घेतली! ती दोन्ही मराठी निरोपगीतं इथं या प्रदर्शनात, लुगडय़ाशेजारी मांडूनच तिचं मांडणशिल्प सिद्ध झालं. भावनांना वाट मिळाली, पण स्वत: चित्रकर्ती भावनावश झालेली नाही.

काहीसं संमिश्र स्वरूपाचं हे प्रदर्शन रीगल सिनेमा आणि ‘सहकारी भांडार कँटीन’समोरच्या ‘क्लार्क हाऊस’ नावाच्याच इमारतीत, मोठय़ा गेटमधून सरळ गेल्यावर पहिलंच पांढरं दुहेरी दार ढकलून आत गेल्यावर पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 3:56 am

Web Title: monsoon exhibition of gallery
Next Stories
1 ठाणे ते गेटवे जलवाहतूक
2 ठाण्यातील राम मारुती मार्गावर बेकायदा टपऱ्यांची रांग!
3 लहान बंधारे बांधा, पण ‘शाई’ नको!
Just Now!
X