महिनाभर ताटकळत राहिलेल्या पावसाने बुधवारी ‘धार’दार दर्शन घडविले. जलधारांच्या मोठय़ा रुपाचे पहिले सुखदर्शन लाभण्याऐवजी मुंबई व ठाणेकरांना मात्र ठिकठिकाणी साचलेले पाणी, कोलमडलेली उपनगरीय वाहतूक, वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरलेले रस्ते याचेच दर्शन घडवले. नालेसफाई केल्याने शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, हा महापालिकेचा दावा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने मुंबईकरांना पहिल्या दैनावस्थेचा सामना करावा लागला. मात्र, सोशिक मुंबईकरांनी त्यालाही धीराने तोंड दिले.
पहिल्याच पावसात मरे आणि हार्बर यांची पुरती वाताहत झाली. पश्चिम रेल्वे सुरळीत चालू असताना मध्य आणि हार्बर मार्गाचा बोजवारा उडाला. कोलमडलेल्या रेल्वेसेवेमुळे मुंबईकरांना रेल्वेतून पायउतार होऊन रुळांवरून पायपीट करावी लागली. कोलमडलेल्या मध्य रेल्वेच्या सेवेने रेल्वे प्रशासनाची पाऊस तयारी किती ‘पाण्यात’ आहे हे दाखवून दिले. रिमझिमता पाऊसही मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा वाजवण्यास पुरेसा ठरला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ठाणे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि लोकलसेवा कोलमडली. त्यानंतर विद्याविहार, कुर्ला, भांडुप येथे पाणी साचत गेले आणि मध्य व हार्बर मार्गाची वाहतूक आणखीनच कोमडली. या पावसामुळे दिवसभरात मध्य आणि हार्बर या दोन्ही मार्गावरील १५०हून अधिक सेवा रद्द करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली.     
पालिकेचा दावा गाळात
मिठी, दहिसर, पोयसर नद्या आणि नाल्यांचे प्रवाह कचऱ्याने रोखल्याने अनेक भाग जलमय झाले. तसेच काही वस्त्या आणि विभाग पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेने केलेल्या रस्त्यालगतच्या गटारांची सफाईही उघडी पडली. पावसाळापूर्व नालेसफाईची कामे १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा १२ जून रोजी पालिकेने केला होता. लहान-मोठय़ा नाल्यांची शंभर टक्के सफाई झाल्याचा दावा पालिकेने या दिवशी केला होता. त्यासंदर्भात बरीच आकडेवारीही दिली होती. रस्त्यालगतच्या गटारांचीही सफाई झाल्याचे अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र ही साफसफाई कशी झाली होती हे पहिल्याच पावसाने दाखवून दिले. ३३ वृक्षही या पावसात उन्मळून पडले.
पाणीकपात सुरू
गेला आठवडाभर चर्चा सुरू असलेली २० टक्के पाणीकपात अखेर पावसाच्या मुहूर्तावर मुंबईत लागू झाली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाच्या आगमनाने आल्हाददायक झालेल्या वातावरणात दुपारी महापालिकेच्या स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संमतीने पाणीकपातीचा निर्णय घेतला गेला. पाणीकपातीचा सर्वाधिक फटका टेकडीवर आणि पाणीवितरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रहिवाशांना पाणीपुरवठय़ाबाबत समस्या येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहेत. शहर – २३६७ ८१०९, पूर्व उपनगर – २५१५ ३२५८, पश्चिम उपनगर – २६१८ ४१७३ या क्रमांकावर तक्रारी स्वीकारल्या जातील.
जलमय भाग
भायखळा, बधवार पार्क, मुंबई सेंट्रल, दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, धारावी, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द, विद्याविहार, मुलुंड, भांडुप, सांताक्रूझ, मालाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, दहिसर, मिलन सब वे
तलावक्षेत्रात अल्पशी वाढ
तलावक्षेत्रात पाऊस झाल्याने पातळीत थोडीशी वाढ झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आकडेवारी मिळू शकली नाही.
राज्यात मात्र प्रतीक्षाच
मुंबई व कोकणाच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी राज्याच्या इतर भागातून तो गायबच झाला आहे. या आठवडय़ात तरी राज्यात मोठय़ा पावसाची शक्यता नाही. विदर्भात
तर सध्या तापमान ४० अंशांच्या आसपास कायम असून, काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे. पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली आहेत.