पाच दिवसांत सर्वदूर; उद्या, परवा काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

सोमवारपासून राज्यभरात पावसाने आघाडी उघडली असून कोकणासह विदर्भ, मराठवाडा येथेही सरी येत आहेत. पुढील पाच दिवस राज्यभरात पावसाच्या सरी राहणार असून बुधवार व गुरुवारी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

गेले पाच दिवस कोकणात पावसाची संततधार असली तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर नव्हता. मात्र बंगालच्या उपसागरावरून आलेल्या वाऱ्यांमुळे विदर्भात रविवारी अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. अरबी समुद्रातही गुजरात किनाऱ्यानजीक कमी दाबाचे क्षेत्र असल्याने गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. या दोन्ही बाजूंनी येत असलेल्या मोसमी वाऱ्यांमुळे राज्याच्या इतर भागातही पावसाचा प्रभाव वाढत आहे. मराठवाडा व मध्य प्रदेश येथेही पावसाच्या सरी सुरू असून बुधवार व गुरुवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येतील, असा अंदाज आहे. रत्नागिरी व रायगडमध्ये तुफान बरसत असलेल्या पावसाने सिंधुदुर्गातही चांगला जोर धरला आहे. रत्नागिरी येथे १६१ मिमी तर हण्र येथे १४४ मिमी पावसाची नोंद झाली. मुरुड येथे १५१ मिमी, रोहा येथे ११५ मिमी तर वेंगुर्ला येथे ११९ मिमी पाऊस पडला.

मुंबईत ३३ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भात सर्वच ठिकाणी पाऊस सुरू असून गडचिरोली येथील अरमोरी येथे ११७ मिमी पाऊस झाला.

धरणांत एक लाख दशलक्ष साठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा एक लाख दशलक्ष लिटरवर पोहोचला. सर्व तलावांची पाणी साठवण्याची एकूण क्षमता १४ लाख दशलक्ष लिटर आहे.

मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ाला दिलासा

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात २९ व ३० जून रोजी चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. २९ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस अपेक्षित असून हा दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचेही हवामानशास्त्रज्ञ सांगत आहेत.

कोकणातील पाऊस तसाच सुरु राहण्याची शक्यता असल्याचे ‘आयएमडी- पुणे’च्या हवामान विभागाच्या संचालक सुनीता देवी यांनी सांगितले. २८ आणि २९ जूनला विदर्भात सर्वदूर पाऊस चांगला होईल. यात काही ठिकाणी मोठा पाऊस होईल. २९ आणि ३० तारखांना मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात चांगला पाऊस अपेक्षित असून महाबळेश्वरसारख्या काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २९ तारखेनंतर २-३ दिवसांसाठी राज्यातील पाऊस कमी होऊ शकेल, असे त्या म्हणाल्या.