केरळमधील पावसाच्या प्रवेशाबाबत अचूक अंदाज देणाऱ्या हवामानशास्त्र विभागाला मोसमी वाऱ्यांनी राज्याच्या प्रवेशाबाबत मात्र चांगलेच चकवले. केरळमध्ये आठवडाभर मुक्काम ठोकलेले मोसमी वारे आता गोव्याच्या दक्षिणेपर्यंत पोहोचले असून पुढील २४ तासांत गोवा, दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हे वारे पोहोचतील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी बुधवारी वर्तवला.

राज्यातील प्रवेशासाठी आधी ७ जूनचा अंदाज देण्यात आला होता. त्यानंतर १२ जूनचा अंदाज देण्यात आला. मात्र हवामानशास्त्राचे अंदाज चुकवताना मोसमी वारे जोरदार घोडदौड करत गोव्याच्या दक्षिणेपर्यंत पोहोचले आहेत. ५ जूनपर्यंत केरळच्या दक्षिणेपर्यंत अडून बसलेल्या मोसमी वाऱ्यांनी दोन दिवसांत उर्वरित केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला आहे. संपूर्ण गोवा, कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसह ईशान्य भारत व प. बंगालमध्ये मोसमी वारे पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील २४ तासांत मोसमी वारे राज्याच्या दक्षिण भागात पोहोचतील, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

मंगळवार, बुधवारी मराठवाडय़ातील अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार आज, गुरुवारपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपासून पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडय़ात सर्वदूर पाऊस

मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ात मृग नक्षत्राचा पाऊस बुधवारी बरसला. परभणी, उस्मानाबाद, लातूर येथे मृगाच्या पूर्वसंध्येला जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादेत उमरगा तालुक्यात सर्वाधिक १०० मिमी पावसाची नोंद झाली. लातूरच्या उदगीरसह अनेक तालुक्यात पेरणीयोग्य असा दमदार पाऊस झाला. या पावसाने शेतकरी सुखावला असून येत्या एक-दोन दिवसात जिल्ह्य़ात पेरणी झाल्याचे चित्र दिसण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद शहर व इतर तालुक्यातही बुधवारी दुपारी मृग नक्षत्राचा पाऊस बरसला.

कावळय़ाचे घर झाडाच्या खालच्या बाजूस

औरंगाबाद :  पावश्याचा आवाज, कावळय़ाचे घर झाडाच्या खालच्या बाजूला, ही लक्षणे चांगल्या पावसाची. उपग्रहावरून मिळालेल्या माहितीपेक्षाही चांगला पाऊस होण्याची ही लक्षणे हवामानाचा अचूक अंदाज देतात. पक्षिमित्रांच्या मते, पक्ष्यांना पावसाचा आणि पाण्याचा वेध घेण्याचा अंदाज निसर्गाकडून उपजतच मिळालेला असतो. या वर्षी कावळय़ाने घरटे जरासे खाली बांधले आहे. तर पावश्याचे गुंजन लवकरच ‘पेर्ते व्हा’ असा संदेश शेतकऱ्यांना देत आहे. प्राणी-पक्ष्यांना निसर्गातील बदलाचा चटकन वेध घेता येतो. ही त्यांना लाभलेली नैसर्गिक देणच आहे. पक्षी हवामान बदलाची सूचना तीन पातळय़ांवर देतात. एक आहे हवामानातील वेगवेगळे बदल. दुसरे आहे किती पाऊस पडेल? आणि तिसरी सूचना पावसापूर्वीची.