उर्वरित महाराष्ट्र मात्र कोरडाच

राज्याच्या किनारपट्टीवर विशेषत: दक्षिण कोकणात मंगळवार-बुधवारच्या दरम्यान मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाऱ्यांच्या हालचालीनुसार अशी शक्यता दिसून येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सोमवार ते गुरुवार या काळात कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र सोडल्यास इतरत्र पावसाचे चिन्ह नाही. काही भागांत तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी सोमवारी हलका ते मध्यम पाऊस, तर पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातदेखील याच काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सांगली जिल्ह्य़ात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

किनारपट्टीवर पावसाची शक्यता असताना विदर्भ आणि मराठवाडय़ाला उष्ण लहरींचा तडाखा जाणवणार आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भाला १७ ते १९ जून या काळात अतितीव्र उष्ण लहरींचा सामना करावा लागू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याच काळात परभणी आणि नांदेड येथे उष्ण लहरींची शक्यता आहे.

वायू चक्रीवादळ आणखीन नैर्ऋत्येला सरकत त्याचा प्रवास कच्छच्या जवळ जात आहे. त्यामुळे कमी दाबाच क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून सोमवारी मध्यरात्रीनंतर कच्छमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिसून येत असल्याचे विभागाने सांगितले. वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणच्या तापमानात घट झाली होती.

पश्चिमेकडील वारे अंतर्गत भागात आल्याचा तो परिणाम असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या आठवडय़ात किनारपट्टी सोडल्यास इतरत्र पावसाचे आगमन नसल्यामुळे घट झालेल्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.