मुंबई उपनगरीय प्रवाशांचे हाल; तासाभराच्या प्रवासासाठी तीन तास; २००हून जास्त फे ऱ्या रद्द

मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बरवरील स्थानकांत रुळावर साचलेले पाणी आणि विविध ठिकाणी झालेले तांत्रिक बिघाड, मरिन लाइन्स स्थानकात दुरुस्तीच्या कामांचे ओव्हरहेड वायरवर पडलेले साहित्य यामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी तीनही मार्गावरील उपनगरी वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील २०० पेक्षा जास्त उपनगरी फे ऱ्या रद्द करण्यात आल्या.  प्रचंड गर्दी आणि प्रवासाचा वाढलेला वेळ यामुळे अनेकांची बरीच रखडपट्टी झाली. रात्री उशिरापर्यंत हाल सुरूच होते.

रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे ७ पासून मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवरील कुर्ला ते शीव दरम्यान रुळ पाण्याखाली गेले. याचा पहिला परिणाम सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या जलद गाडय़ांवर झाला. जलद मार्गावरील गाडय़ा मग धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे अनेक फे ऱ्या रद्द झाल्या. गाडय़ा अर्धा ते पाऊण तास उशिराने धावू लागल्याने फलाट आणि गाडय़ांमध्येही एकच गर्दी होऊ लागली. गाडी पकडताना कमालीची धक्काबुकी होत होती. त्यामुळे महिला आणि वृद्ध प्रवाशांचे हाल झाले. कुर्ला ते शीवदरम्यान धीम्या मार्गावर पाण्याची पातळी कमी असल्याने या मार्गावरील गाडय़ांचा वेग कमी राखला गेला. त्यामुळे प्रवासासाठी बराच विलंब होत होता.

हार्बरवरील गोवंडी ते मानखुर्द दरम्यानरही रुळांवर पाणी साचले. तर जुईनगर येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे गाडय़ांच्या वेगावर र्निबध आले. परिणामी हार्बरवरील गाडय़ाही अर्धा तास उशिराने धावू लागल्या. या गोंधळामुळे रात्री आठपर्यंत मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील ५२ तर हार्बरवरील ३१ गाडय़ा रद्द करण्यात आल्या.  पश्चिम रेल्वेवरील सेवेलाही फटका बसला. दादर स्थानकात सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि मरिन लाइन्स स्थानक इमारतीच्या दुरुस्तीसाठी बांधण्यात आलेले बांबू आणि संरक्षक जाळी ओव्हरहेड वायरवर कोसळली आणि मोठा स्फोट झाला.

सकाळी ८ वाजता मरिन लाइन्स स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यानच्या धीम्या गाडय़ांचा मार्ग बंद करण्यात आला. या मार्गावरील गाडय़ा जलद मार्गावर वळवण्यात आल्याने वेळापत्रकाचे तीनतेराच वाजले. त्यात पालघर स्थानकात साचलेल्या पाण्यामुळे डहाणूपर्यंत जाणाऱ्या फे ऱ्यांवरही परिणाम झाला. मरिन लाइन्स स्थानकातील ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी सकाळचे अकरा वाजले. त्यामुळे गाडय़ांचे वेळापत्रक आणखी विस्कळीत झाले.

कल्याण ते सीएसएमटी तीन तासांचा प्रवास

कल्याण ते सीएसएमटी धीम्या मार्गावरील प्रवासासाठी एरवी दीड तासांच्या प्रवासाला सोमवारी मात्र तीन तास लागले. कुर्ला ते शीवदरम्यान रुळावर साचलेल्या पाण्यामुळे प्रवास वेळ लांबला. पाणी ओसरल्यानंतर जलद गाडय़ा पूर्ववत धावू लागल्या. परंतु जलद मार्गावरील प्रवासासाठीही काही तास लागत होते. डोंबिवली ते सीएसएमटी जलद प्रवासासाठी एरवी एक तास लागतो. परंतु सोमवारी हाच प्रवास दोन तासांचा होत होता. सीएसएमटीपर्यंत एक्स्प्रेस गाडय़ा तरी सुरळीत धावतील, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी कल्याण, ठाणे स्थानकातून एक्स्प्रेस गाडय़ा पकडल्या. परंतु दादर, सीएसएमटीपर्यंत जाताना त्यांनाही दीड ते दोन तास लागले.