निम्म्या पावसाळ्यानंतरही जनावरांच्या ६९३ छावण्या सुरू

मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्राला झोडपणाऱ्या पावसाने मराठवाडा-विदर्भाला पुन्हा एकदा हुलकावणी दिल्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. निम्मा पावसाळा संपला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे अनेक भागांत आजही ६९३ चारा छावण्यांमध्ये चार लाख १८ हजार जनावरांनी आसरा घेतला आहे.

मराठवाडय़ातील जिल्हे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्य़ांतील दुष्काळी परिस्थितीमुळे त्या त्या भागांत आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार दुष्काळी भागात १५८३ छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावण्यांमध्ये साडेदहा लाख जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. छावण्यांमध्ये आतापर्यंत औरंगाबाद विभागात २७९ कोटी, पुणे विभागात ४३ कोटी, नाशिकमध्ये १७५ कोटी असे ५१५ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

पावसाळा सुरू झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने ज्या भागात पाऊस पडला आणि चारा उपलब्ध झाला आहे, त्या भागातील छावण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मराठवाडय़ासह अन्य भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा असल्याने चारा- पाण्याची टंचाई जाणवत आहे. परिणामी सोलापूर जिल्ह्य़ात आजमितीस सर्वाधिक २७३ छावण्या सुरू असून त्याच एक लाख ७८ हजार जनावरे आहेत. अहमदनगरमध्ये १६० छावण्यांमध्ये ९० हजार जनावरे आणि सातारा जिल्ह्य़ात ११३ छावण्यांमध्ये ६३ हजार जनावरे आहेत.

विशेष म्हणजे महापुराने उद्ध्वस्त झालेल्या सांगली जिल्ह्य़ाच्या काही भागांत पावसाची प्रतीक्षा असल्याने ४५ छावण्यामध्ये २३ हजार, तर पुणे जिल्ह्य़ात ४२ छावण्यांमध्ये २४ हजार जनावरे ठेवण्यात आली आहेत.

बीडमधील छावण्यांची संख्या कमी झाली असली तरी आजही ४४ छावण्यांमध्ये २७ हजार, तर उस्मानाबादमध्ये १६ छावण्यामध्ये १० हजार जनावरांची चारा-पाण्याची सोय करण्यात आली आहे. या छावण्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असली तरी चारा-पाणी उपलब्ध होताच छावण्या बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मदत आणि पुनर्वनस विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मराठवाडय़ात अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस

कोल्हापूर-सांगली येथे महापुराचा फटका बसला असला तरी, ऑगस्ट अर्धा संपतानाही मराठवाडय़ातील पावसाने सरासरी गाठलेली नाही. सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला आहे. बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आला.