गेल्या काही दिवसांपासून घामाच्या धारांनी भिजत असलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी मान्सूनच्या सुखद धारांनी भिजवले. गुरुवारी रात्रीपासून मुंबई व परिसरात पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत मुंबई व उपनगरांतील अनेक भाग पावसाने चिंब झाले होते. हवामान खात्यानेही मान्सूनचे मुंबईत आगमन झाल्याची सुवार्ता दिली असून, थोडय़ाच काळात मान्सून राज्यभरात सक्रिय होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
मान्सून मुंबईत थडकला असून गुरुवारी रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे वातावरणात गारवा आल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हवामान विभागाने म्हटले आहे, की येत्या चार-पाच दिवसांनंतर मुंबईत मान्सूनचा पाऊस नियमित सुरू होईल. मान्सूनचे वारे मुंबईत आले असून ते डहाणूपर्यंत पोहोचले आहेत. मान्सून स्थिर होण्यास थोडा वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीचा पाऊस अनियमित असतो, पण येत्या चार-पाच दिवसांत तो सुरळीत होईल, असे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे महासंचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले.  मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने हवेतील उष्मा कमी झाला असून, कमाल तापमान कमी झाले आहे. रात्री ते आणखी कमी होईल असे सांगून ते म्हणाले, की गेल्या २४ तासांत दक्षिण मुंबईत २४.४ मिमी पाऊस झाला असून उपनगरात ८२.२ मिमी पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा येथे ३२.८ तर सांताक्रूझला ३५ अंश सेल्सियस होते. किमान तापमान अनुक्रमे २६ व २३ अंश सेल्सियस होते.

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

कोकणातील बळीराजा मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट बघत असतानाच येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही जून महिन्याचा पूर्वार्ध कमी पावसाचा ठरला आहे. मात्र आगामी तीन दिवसांत काही ठिकाणी ७ ते २४ सेंटीमीटर इतका पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आज, उद्या, परवा उंच लाटा?
मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवार, रविवार आणि सोमवारी उधाणाच्या वेळी चार मीटरपेक्षा उंच लाटा धडकण्याची शक्यता आहे.
रविवारी सकाळी १०.५१ वाजता ४.३२ मीटर तर सोमवारी सकाळी ११.३९ वाजता ४.५१ मीटर आणि रात्री ११.३४ वाजता ४ मीटर उंचीची लाट धडकण्याची शक्यता आहे.