|| प्रसाद रावकर

मुंबईमध्ये अतिवृष्टी होणार असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने व्यक्त केला आणि त्यापाठोपाठ हवामानशास्त्र विभागानेही मुंबईमध्ये ९, १० आणि ११ जून रोजी अतिवृष्टी होणार असे भाकीत केले. हवामानशास्त्र विभागाचा अंदाज शिरसावंद्य मानून मुंबई आणि ठाणे पालिकांनीही नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला. परिणामी, मुंबईकरांच्या मनात ‘२६ जुलै २००५’च्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मुंबईत ९ जून रोजी अतिवृष्टीने हाहाकार होणार अशी खूणगाठ बांधून तमाम मुंबईकरांनी आपले कार्यक्रम रद्द केले. काही जणांनी बाहेरगावी जाण्याचा बेत रद्द केला, तर काही जणांनी महत्त्वाची कामे लांबणीवर टाकून घरी बसणे पसंत केले. हातावर पोट असलेल्या तमाम मुंबईकर अस्वस्थ झाले. झोपडपट्टीवासीयांनी तर आपले किडुकमिडुक सामान गोळा करून सुरक्षितस्थळी जाण्याची धडपड सुरू केली. यापूर्वी पूरस्थितीचा फटका बसलेल्या काही मुंबईकरांनी सुरक्षित स्थळ गाठले. नदी-नाल्याकाठच्या आणि डोंगराळ भागात वास्तव्याला असलेले रहिवासीही भेदरून गेले. मुंबई महापालिकेने तर सावधगिरी बाळगत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शनिवार आणि रविवारच्या रजा रद्द केल्या. सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा, नागरिकांना मदत मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना ठिकठिकाणी सज्ज राहण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले. मुंबईमध्ये राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि शहर आपत्ती प्रतिसाद पथक सज्ज करण्यात आले. ठाण्यामध्ये तर नाल्याच्या काठावरील आणि डोंगराळ भागातील रहिवाशांना स्थलांतरित होण्याची सूचना करण्यात आली. पोलिसांनीही हवामानशास्त्र विभागाच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेतली. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा केवळ हवामानशास्त्र विभागाच्या इशाऱ्यामुळे सज्ज झाल्या.

मुंबईमध्ये शुक्रवारी मध्यरात्री पाऊस सुरू झाला. अधूनमधून चमचमणाऱ्या विजा आणि गडगडणाऱ्या ढगांचा नाद मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशारा खरा ठरणार असेच सर्वाना वाटत होते. शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळीही पडतच होता. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास पावसाने जोर धरला आणि आता काही खरे नाही असेच सर्वाना वाटू लागले. हिंदमाता, दादर सर्कल, किंग्ज सर्कल, सायन आदी काही भागांमध्ये पाणी साचले आणि पालिकेच्या नालेसफाईचे दावे फोल ठरले. पण हळूहळू पावसाचा जोर कमी होत गेला. साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. कोसळणाऱ्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. पुन्हा संध्याकाळी पावसाच्या काही सरी कोसळल्या आणि रात्री मुंबईकर निद्रिस्त झाले. रविवारी सुट्टीचा दिवस. मुसळधार पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद लुटायचा असा बेत अनेकांनी आखला होता, पण नेमके उलट झाले. रविवारी दिवसभर मुंबईत लख्ख ऊन पडले. घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आणि मग हवामानशास्त्र विभाग आणि त्यांनी दिलेला अतिवृष्टीचा इशारा खिल्लीचा विषय बनला. शुक्रवारी पडलेला पाऊस ही काही अतिवृष्टी नव्हती. गेल्या वर्षी ३० ऑगस्ट रोजी असाच इशारा देण्यात आला होता आणि त्या वेळीही मुंबईकरांना असाच अनुभव आला होता.

‘स्कायमेट’च्या पावलावर पाऊल ठेवून हवामानसास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा देऊन मुंबईकरांमध्ये प्रचंड घबराट निर्माण केली. सर्व यंत्रणा वेठीस धरल्या गेल्या. या सर्वाला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेची नालेसफाई, रस्ते घोटाळा उघडकीस आल्यानंतर पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. रस्ते विभाग आणि दक्षता विभागाच्या प्रमुखांना तर तुरुंगाची हवा खावी लागली. आपत्कालीन परिस्थितीत अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्याचा इशारा यापूर्वी काही प्रकरणांमध्ये देण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय अथवा खासगी कंपनीमध्ये कामात कसूर करणारा अधिकारी असो वा कर्मचारी त्याला त्याबद्दल शासन केले जातेच. मग आता अतिवृष्टीचा इशारा देऊन मुंबई-ठाण्यात घबराटीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कोण आणि कुठली कारवाई करणार असा प्रश्न आहे. किमान हवामानशास्त्र विभागाचे अंदाज का चुकतात याची चौकशी करण्याचे धाडस तरी दाखविले जाणार की नाही वा मुंबईकरांनी वारंवार अशा अनुभवांचा सामना घ्यायचा.

डॉप्लर रडार बसविण्यासाठी पालिकेकडून जागा उपलब्ध झाली आहे, पण अद्याप डॉप्लर रडार काही कार्यान्वित होऊ शकलेले नाही. यात सरकारचीही हेळसांड दिसून येते. एरवी सरकार पालिका अथवा अन्य यंत्रणा, खाती, विभागांच्या कामावर लक्ष ठेवून असते. वेळप्रसंगी सरकार या सर्वाच्या कारभारात हस्तक्षेपही करते; मग हवामानशास्त्र विभागाला वेगळा न्याय का देण्यात येत आहे.

हवामानशास्त्र विभाग एक महत्त्वाचा विभाग आहे. वातावरणात झपाटय़ाने बदल होत आहेत. या बदलांमागची कारणे, त्यामुळे होणारे परिणाम यांचा अभ्यास करून जनमानसात जनजागृती करणे गरजेचे आहे. किंबहुना, हवामानातील बदलांबाबत मिळणाऱ्या संकेतानुसार संबंधित अन्य यंत्रणांना हाताशी घेऊन ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न या विभागाने करणे गरजेचे आहे. पण चौकटीबाहेर जाऊन काम करायचे नाही अशी सर्वच यंत्रणांची मानसिकता झाली आहे. त्याला हवामानशास्त्र विभाग अपवाद नाही. पण भविष्यात या विभागाने अधिक जबाबदारीने आपले काम करण्याची गरज आहे, अन्यथा मुंबईकरांना भविष्यातही ‘लांडगा आला रे आला’चाच अनुभव येईल.

prasadraokar@gmail.com