आर्थिक गुंतवणूक आटण्याची पालिका अधिकाऱ्यांना भीती

घटकाभराच्या पावसात जलमय होणारे सखल भाग, काही तासांच्या सरींनी पाण्याखाली जाणारे रूळ, तुडुंब भरून वाहणारे नाले यामुळे मुंबईची ‘तुंबई’ होण्याची धास्ती दरवर्षीचीच. पालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र, प्रत्यक्ष ‘तुंबई’पेक्षा तिच्या बोभाटय़ाचीच अधिक धास्ती वाटत आहे. अवघ्या १०० मिमी पावसाने शहर जलमय होत असले तरी, त्याचा अपप्रचार करू नका, अन्यथा मुंबईत आर्थिक गुंतवणूक करणारे पुढे येणार नाहीत, असा सल्ला पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिला.

आठवडाभरात झालेल्या पावसात शहरात वारंवार अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याबद्दल सत्ताधारी व प्रशासनाला जबाबदार धरीत विरोधी पक्षांनी सोमवारी स्थायी समितीची सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. नाल्यांमधील ९० टक्के गाळ काढला आहे, असा दावा पालिकेने केला होता, मात्र पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची सफाईच झालेली नाही, त्यामुळे दादरमधील पारसी कॉलनीसारख्या यापूर्वी पाणी न साचणाऱ्या ठिकाणीही या वेळी पाणी तुंबले, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. काँग्रेसचे नगरसेवक असिफ झकेरिया, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आणि सपाचे गटनेता रईस शेख यांनी प्रशासनाविरोधात बाजू मांडली तर सेनेच्या मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला सावरून घेत मुंबईच्या बशीसदृश भौगोलिक स्थितीला पाणी साठण्यासाठी जबाबदार धरले.

प्रशासनाकडून बाजू मांडताना अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. हिंदमाताला पाणी साचले तरी त्याचा अध्र्या तासात निचरा झाला, असा दावा त्यांनी केला. मात्र मुंबईत पाणी साचल्याबद्दल नाहक बदनामी होत असून त्यामुळे मुंबईमध्ये गुंतवणूक येणार नाही, असे मुखर्जी यांनी सांगितले. नालेसफाई करूनही त्यात सातत्याने कचरा पडतो, त्याबाबत मुंबईकरांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

‘हिंदमाता नव्हे, हिंदसागर’

साधा शिडकावा झाला तरी हिंदमाताला पाणी भरते. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून १२० कोटी रुपये खर्च करून ब्रिटानिया जलउपसा केंद्र बांधण्यात आले. पाणी वाहून नेणारी वाहिनी रुंद करण्यासाठी ३३ कोटी रुपये मंजूर करून घेण्यात आले. तरीही हिंदमाताला कंबरभर पाणी तुंबले आणि प्रशासन चार इंच, सहा इंच पाणी साठले, असा दावा करीत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. आता हिंदमाताचे नाव बदलून हिंदसागर ठेवायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.