आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्याच्या अंतर्गत भागासह कर्नाटक व तामिळनाडू या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यांमध्ये गेले दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र उर्वरित ऑगस्टमधील पावसाची देशातील कामगिरी पाहत मान्सूनचा टक्का आणखी घसरला आहे. आता देशातील मान्सूनची सरासरी ९२ वरून ९१ टक्क्यांवर आली आहे. राज्यातील पावसाचे प्रमाण तर अवघे ७४ टक्के आहे. साधारण ९४ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस हा सामान्य समजला जातो.
पूर्व किनाऱ्यावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच हिमाचल प्रदेश व पूर्व राजस्थानमध्येही सुरू असलेला पाऊस यामुळे गेले दोन दिवस देशातील पावसाचे चित्र काहीसे सकारात्मक झाले आहे. मात्र हा मध्यम स्वरूपाचा पाऊस आधीची टक्केवारी भरून काढण्यासाठी पुरेसा नाही. जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे व त्यामुळे शेतीचे महिने समजले जातात. जुलैमध्ये सरासरीपैकी अवघा ८० टक्के पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे डोळे ऑगस्टवर लागले होते. मात्र अर्धा ऑगस्ट उलटत आला असतानाही दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. ओडिसा व आंध्र प्रदेशानजीकच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा फायदा महाराष्ट्रालाही होत आहे. त्याचसोबत तामिळनाडू व कर्नाटकच्या अंतर्गत भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्याच वेळी पावसाच्या प्रमाणाचा टक्का मात्र घसरला आहे.
चार दिवसांपूर्वी सरासरीच्या आठ टक्के तूट दाखवणारा आकडा आता नऊवर घसरला आहे. देशातील मान्सूनची सरासरी ८८ टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने जूनच्या सुरुवातीला नोंदवला होता. पावसाची सध्याची एकंदर स्थिती पाहता हा अंदाज योग्य ठरण्याची चिन्हे आहेत.
मराठवाडय़ात मुसळधार
औरंगाबाद : दुष्काळछायेवर मात करण्यास हुरूप वाटावा, असा पाऊस मंगळवारी मराठवाडय़ातील काही महसूल मंडळांत बरसला. तब्बल ३४ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. दुष्काळग्रस्त भागात झालेल्या या पावसामुळे चाऱ्याची तातडीची गरज काही दिवस भागू शकेल, असे वातावरण आहे. विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्य़ातील बेंबळी, मुळज, उमरगा केंद्रांत अतिवृष्टी झाली. जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ांतही मंगळवारी झालेल्या पावसाने चांगला दिलासा मिळाला.