मान्सूनने सोमवारी राज्यात प्रवेश केला. गोवा ओलांडून तो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्य़ांमध्ये दाखल झाला. मात्र, सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘अशोबा’ चक्रीवादळाचा त्याच्या पुढील प्रवासावर विपरीत परिणाम होणार असून, राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचण्यासाठी त्याला किमान चार-पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अशोबा चक्रीवादळाने मान्सूनचे ढग पळवून नेले आहेत. ते सोमवारी सकाळी मुंबईपासून ५९० किलोमीटर अंतरावर, तर गुजरातमधील वेरावळ किनाऱ्यापासून ४७० किलोमीटर अंतरावर होते. त्याची तीव्रता वाढत असून, त्यातील वाऱ्यांचा वेग ताशी ९० ते १२० किमी इतका वाढण्याची शक्यता आहे. ते महाराष्ट्र-गुजरातच्या किनाऱ्याऐवजी ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.
‘अशोबा’ म्हणजे?
अशोबा हे श्रीलंकेने दिलेले नाव आहे. त्याचा अर्थ नकोसा असलेला किंवा अशुभ असा असल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.