26 February 2021

News Flash

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये

४ जुलैपासून सुरू करण्याचे राज्यपालांचा आदेश

(संग्रहित छायाचित्र)

चौथ्यांदा उपराजधानीला मान; ४ जुलैपासून सुरू करण्याचे राज्यपालांचा आदेश

मुंबई : पुढील महिन्यात सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. भर पावसाळ्यात राज्य सरकारचा कारभार मुंबईऐवजी नागपूरमधून चालेल. आतापर्यंत तीन वेळा पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झाले असून, चौथ्यांदा उपराजधानीत अधिवेशन होत आहे.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ४ जुलैपासून नागपूरमध्ये सुरू होईल, असा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढला आहे. राज्यपालांच्या आदेशाने पावसाळी अधिवेशन मुंबई की नागपूर हा संभ्रम दूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची कल्पना सरकारच्या वतीने मांडण्यात आली होती. पण पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास होणारा विरोध लक्षात घेता सत्ताधाऱ्यांनी निर्णय जाहीर करण्याचे टाळले होते. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय मंत्र्यांची समिती अधिवेशनाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता नेमण्यात आली होती. पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. फक्त राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याकरिता ही समिती नेमण्यात आली होती. सरकारचा निर्णय आधीच झाला होता. यामुळे मंत्र्यांची समिती ही निव्वळ धुळफेक होती, अशी टीका झाली होती.

नागपूर करारानुसार वर्षांतील एक अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसाने अधिवेशनात अनेकदा विघ्ने येतात. सरकारी खर्चाला मान्यता देण्याकरिता जुलै महिन्यात होणारे अधिवेशन महत्त्वाचे आहे. यामुळेच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत आग्रही होते. त्यानुसार पावसाळी अधिवेशन आता नागपूरमध्ये होईल.

जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडतो. मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. नेमकी  तेव्हाच सरकारी यंत्रणा नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनात मग्न असेल. यामुळेच शिवसेनेच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास विरोध दर्शविला होता. मुंबईत सध्या महानगरपालिकेपेक्षा सरकारी यंत्रणांची कामे अधिक सुरू असून, पाणी तुंबण्याची भीती या कामांमुळे अधिक आहे. पाणी तुंबल्यास सारी टीका महानगरपालिकेवर होते, पण प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांची कामे तेवढीच जबाबदार असतात, असे शिवसेना आमदारांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत तीन वेळा नागपुरात पावसाळी अधिवेशन

पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास विरोध झाला होता. मुंबईप्रमाणेच विदर्भात जोरदार पाऊस पडतो. मुंबईहून पाच हजारहून अधिक शासकीय कर्मचारी तर १० हजारांच्या आसपास पोलीस कर्मचारी नागपूरमध्ये तैनात करावे लागतात. एवढय़ा कर्मचाऱ्यांची पावसाळ्यात सोय कुठे करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. सरकारी यंत्रणेला महिनाभरात साऱ्या सुविधा उपलब्ध करण्याची कसरत करावी लागेल. आतापर्यंत १९६१, १९६६ आणि १९७१ असे तीनदा पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये झाले आहे. आता चौथ्यांदा पावसाळी अधिवेशन उपराजधानीत होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 2:09 am

Web Title: monsoon session of maharashtra legislature maharashtra legislature monsoon session in nagpur
Next Stories
1 पंचगंगेचे पाणी शेतीसाठीही घातक
2 केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकास दर कमी
3 विरोधात मतदान केल्याने पाणी बंद करण्याची शिक्षा
Just Now!
X