अंदमानातील पाऊस शुक्रवारीच पुढे सरकला असला तरी अजूनही केरळमध्ये मोसमी पाऊस आल्याची अधिकृत घोषणा वेधशाळेने केलेली नाही. मात्र दोन दिवसात मोसमी पाऊस केरळमध्ये पोहोचेल असे वेधशाळेने रविवारच्या अंदाजात नमूद केले आहे. दरम्यान राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश येथे उष्णतेची लाट असून आणखी तीन दिवस तिचा प्रभाव कायम राहील. अंदमान बेटांवर १८ मे रोजी दाखल झालेला मान्सून ३ जून रोजी पुढे सरकला. कर्नाटकच्या किनाऱ्यावरील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कर्नाटक व गोवा किनाऱ्यावर पाऊस सुरू झाला व केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र आता पुन्हा एकदा केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.