येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रातून परतणार असल्याच्या आयआयटीएमच्या ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी) अहवालामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. राज्यात आता आणखी पाऊस पडण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट संकेत आयआयएमटीच्या अहवालात देण्यात आले आहेत. राज्यात कमी पाऊस पडण्याचे हे सलग दुसरे वर्ष ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी गणरायाच्या आगमनाबरोबर राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारपासून या पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वेधशाळेने यापूर्वीच व्यक्त केला होता. अखेर आज ‘आयआयएमटी’च्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केले. पाऊस परत जात असून २०१६ पर्यंत शेतकऱ्यांना दिलासा देणारी स्थिती निर्माण होताना दिसत नाही. कृत्रिम पावसाचा प्रयत्न केला तरी त्यातून विशेष असे काहीच हाती लागणार नसल्याचे आयआयएमटीच्या तज्ज्ञांनी सांगितले. यंदाच्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशात सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाल्याचे समोर येते आहे.