३० दिवसांऐवजी ३८ ते ४० दिवसांचे वीजबिल पाठवून ग्राहकांचा रोष ओढवून घेणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अखेर घुमजाव करून पुन्हा पूर्ववत महिन्याची बिले पाठविण्याचे एका बैठकीत मान्य केले आहे. तसेच शहरातील वीज ग्राहकांच्या वाढीव बिलासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या वतीने शिबिरे भरविण्यात येतील, असे आश्वासनही ठाणे विभागाचे मुख्य अभियंता देवरे यांनी ग्राहकांच्या शिष्टमंडळास दिले आहे.
नव्या मिटरमुळे जास्त बिल येत असल्याच्या शहरातील अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात भाजप नेते संजय केळकर यांच्या नेतृत्त्वाखाली ग्राहकांच्या शिष्टमंडळाने देवरे यांची भेट घेऊन त्यांना अडचणी सांगितल्या. नव्या मिटरविषयी ग्राहकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या शंकांचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निरसन करावे आणि तोपर्यंत नवे मिटर लावणे बंद करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. याबाबत ग्राहकांच्या मनात तीव्र असंतोष असून त्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी महावितरणच जबाबदार असेल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला. त्यावर ग्राहकांच्या तक्रारी ऐकून सदोष बिले दुरूस्त करून द्यावीत, असे देवरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी शिबिरे भरविण्याची शिष्टमंडळाची सूचनाही त्यांनी मान्य केली. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी  कॉल सेंटर सुरू करण्यात येईल, अशी माहितीही महावितरणच्या वतीने शिष्टमंडळास देण्यात आली.