लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: बेस्टच्या ताफ्यात आणखी २६ वातानुकूलित विद्युत गाडय़ा दाखल झाल्या आहेत. या सर्व गाडय़ा भाडेतत्त्वावरील आहेत. भाडेतत्त्वावरील ४० आणि बेस्टच्या मालकीच्या ६ विद्युत बसगाडय़ा बेस्टच्या ताफ्यात आहेत. बेस्टचा ताफा वाढत असल्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात विजेवर चालणाऱ्या ३०० बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, अशी घोषणा बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी केली होती. आतापर्यंत केवळ ४० बसेस दाखल झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात टप्प्याटप्प्याने उर्वरित बसेस दाखल होणार होत्या. त्यापैकी टाटा मोटर्सच्या २६ बसेस गुरुवारी दाखल झाल्या. आरटीओ पासिंगची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत येतील, असे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बेस्ट परिवहन विभागाच्या स्वत:च्या मालकीच्या सहा व भाडेतत्त्वावरील ६६ अशा एकूण ७२ गाडय़ा आतापर्यंत झाल्या आहेत.

इंधनाच्या धुरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. विजेवर चालणाऱ्या गाडय़ा ही काळाची गरज आहे. त्यानुसार बेस्टने विद्युत गाडय़ांचा ताफा वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या गाडय़ांच्या चार्जिगसाठी सध्या बॅकबे व वरळी बस आगारात चार्जिग केंद्र उभारली आहेत.