News Flash

१९ लाख घरांसाठी जादा चटई क्षेत्रफळ

युती शासनाच्या कालावधीत ही कंपनी १९९८ मध्ये स्थापन करण्यात आली होती.

सहा ते २०० एकर भूखंडावर परवडणाऱ्या घरांच्या वसाहती..

राज्यातील भाजप-सेना शासनाने २०२२ पर्यंत १९ लाख परवडणाऱ्या घरांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी शहराबाहेर वसाहती स्थापन करू इच्छिणाऱ्या विकासकांना जादा चटई क्षेत्रफळ देण्याचा विचार शासन करीत आहे. सहा एकरपासून २०० एकपर्यंत भूखंडाचे मालकी हक्क असलेल्या तब्बल ३० विकासकांनी परवडणाऱ्या घरांची योजना शासनाला सादर केली आहे. परंतु यासाठी जादा चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून दिले तरच ते शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
पनवेल, कल्याण, कर्जत, रसायनी, शिल आणि तुर्भे येथील परिसरात वसाहत विकसित करण्यासाठी या विकासकांनी प्रस्ताव दिले आहेत. शासनाने ५०० कोटी रुपयांचा निधी म्हाडाकडून उपलब्ध करून देऊन पुनरुज्जीवित केलेल्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि. या कंपनीशी संयुक्त भागीदारी करण्यास हे विकासक इच्छुक आहेत. युती शासनाच्या कालावधीत ही कंपनी १९९८ मध्ये स्थापन करण्यात आली होती. मात्र गेल्या १५ वर्षांत या कंपनीचे अस्तित्व विकासकांना आर्थिक निधी देण्यापुरतेच मर्यादित राहिले होते. मध्यंतरीच्या काळात या कंपनीसाठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकही नव्हता. म्हाडा वा झोपु प्राधिकरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे या कंपनीचा कार्यभार सोपविण्यात आलेला असे. परंतु आता प्रधान सचिव देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या ३० पैकी केळवली येथे १०० एकरवर हबटाऊन तर कर्जतजवळ ब्रिक इगल समुहामार्फत २०० एकरवर शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि.मार्फत संयुक्त भागीदारीतून वसाहत विकसित करण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. उर्वरित २८ प्रस्ताव हे शंभर एकरहून कमी आहेत. मात्र या प्रस्तावांतूनपरवडणारी घरे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात, असा या विकासकांचा दावा आहे. यापैकी अनेक प्रस्तावांमध्ये परवडणारी घरे बांधून देण्याबरोबर भूखंडातील वाटा विकासकांनी देऊ केला आहे. मात्र या मोबदल्यात जादा चटई क्षेत्रफळाची मागणी केली आहे. सध्या मुंबईबाहेर अशा वसाहतींसाठी एक इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने राबविलेल्या भाडय़ाच्या घरांच्या योजनेच्या धर्तीवर या विकासकांकडून परवडणारी घरे बांधून घेता येतील का, या दृष्टीने चाचपणी सुरू असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. हे धोरण लागू केल्यास तीन इतके चटई क्षेत्रफळ विकासकांना उपलब्ध होऊ शकेल, असेही त्याने सांगितले. या संदर्भात चक्रवर्ती यांचा संपर्क होऊ शकला नाही.

चटई क्षेत्रफळ म्हणजे..
भूखंडावर किती आकाराचे बांधकाम करता येऊ शकते याबाबतचे प्रमाण म्हणजे चटई क्षेत्रफळ होय..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:53 am

Web Title: more carpet area to 19 lakhs home
Next Stories
1 औंध संगीत अमृतमहोत्सव अभिजात स्वरांत रंगला
2 १५० रुपयांची लाच.. १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता..!
3 दूषित पाण्यामुळे बालकाचा मृत्यू
Just Now!
X