देवेंद्र फडणवीस यांची टीका ; मुख्यमंत्री समाजमाध्यमावर व्यग्र असल्याचा आरोप

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार संपूर्ण अपयशी ठरले. परिस्थिती योग्यपणे हाताळली असती तर करोनाबाधित तसेच मृत्यूंची संख्या कमी झाली असती. वैद्यकीय उपकरणे, पीपीई किटससह अन्य खरेदी आणि जम्बो रुग्णालय उभारणे यात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला. एवढे होऊनही सरकार फे सबुकमध्ये व्यग्र होते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावरील चर्चेत फडणवीस यांनी करोना परिस्थिती हाताळण्यापासून, राज्यपालांचा झालेला अपमान, कायदा आणि सुव्यवस्था, पूजा चव्हाण आत्महत्या अशा विविध विषयांवर सरकावर टीका केली. या चर्चेला उद्या मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.

करोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले. ही परिस्थिती योग्यपणे हाताळली असती तर राज्यात सुमारे नऊ लाख रुग्ण कमी बाधित झाले असते आणि ३० हजार मृत्यू टळले असते, असे फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालाचा आधार घेत सांगितले.

नवी मुंबईत चाचण्या न करताच रुग्णांना संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. राज्य सरकारने ‘माझे कु टुंब, माझी जबाबदारी’ आणि ‘मी जबाबदार’ असे अभियान राबविले. सारे कुटुंबांवर सोपवून सरकारने काय केले, असा सवाल केला. देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येत २५ टक्के रुग्ण आणि ३४ टक्के मृत्यू हे राज्यात झाले. हे चिंताजनक असल्याचेही सांगितले.

करोना काळात वस्तूंची चढय़ा दराने खरेदी करण्यात आली. विक्र मी काळातच जम्बो रुग्णालये उभारली. परंतु करोना काळात जम्बो भ्रष्टाचार झाल्याची टीका फडणवीस यांनी केली. आरोग्य खात्याच्या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाबद्दलही त्यांनी सरकारवर हल्ला चढविला.

केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा देणारे ट्वीट केल्याबद्दल भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची चौकशी केली जाते. पण पुण्याच्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण करणाऱ्या शार्जिल उस्मानीच्या विरोधात काहीच कारवाई के ली गेली नाही. पूजा चव्हाण या युवतीच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आले ते सारे चीड आणणारे होते. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी फडणवीस यांनी केली.

उद्धव ठाकरे यांना कोपरखळी ..

उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये विधानसभेत चकमक उडाली. उभयतांनी परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. मुख्यमंत्री समाजमाध्यमांमध्ये व्यग्र असतात. अलीकडेच त्यांनी समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतो, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही, अशी कबुलीच दिली. आम्ही गेली सव्वा वर्षे तेच बोलत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविताना फडणवीस म्हणाले, आम्ही आपल्याला ओळखले नसले तरी ओळखून आहोत. त्यावर इतके  वर्षे मला बघता, मग मला ओळखले नाहीत का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

राज्यपालांचा अपमान आणि आता आभार ..

राज्यपालांचा अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा ठराव सत्ताधाऱ्यांनी मांडल्याबद्दल फडणवीस यांनी चिमटा काढला. याच राज्यपालांना काही दिवसांपूर्वी विमानातून उतरविण्यात आले होते. राज्यपालांबरोबर मतभेद झाले असले तरी मनाचा कोतेपणा दाखविल्याबद्दल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. यापूर्वीही राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री, असा संघर्ष राज्यात झाला होता. पण अशा पद्धतीने राज्यपालांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी अपमानित केले नव्हते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

ट्वीटमागे भाजपची मंडळी – गृहमंत्री

लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची सरकारने चौकशी केलेली नाही. काही व्यक्तींनी के लेल्या ट्वीटमधील मजकूर समान होता. त्याची चौकशी केली असता भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील काही जणांनी हे ट्वीट केल्याचे निदर्शनास आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्या आरोपांवर स्पष्ट केले.

आरोग्य विभागाच्या पदभरतीतील गैरप्रकारांबाबत सोमवारी निर्णय

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रिक्त पदे भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात काही आक्षेप घेण्यात आले आहेत. त्या संदर्भात सोमवारी योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

‘विद्यापीठांच्या कारभारात मंत्र्यांचा हस्तक्षेप’

दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी मंत्र्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामे दिले आहेत. मंत्र्याचा विद्यापीठाच्या कारभारात हस्तक्षेप वाढला आहे. असे सांगत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या आस्थापनेतील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुत्यांबद्दलही आश्चर्य व्यक्त केले.

‘कुलगुरूंचा राजीनामा वैयक्तिक कारणासाठी’

मुंबई : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (बाटू) कुलगुरूंनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ातच तो कुलपतींकडे पाठवण्यात आला असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्पष्ट केले. जळगाव येथील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील  यांनी आणि बाटूचे कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनी राजीनामा दिल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली. डॉ. पाटील यांनी आरोग्य समस्येमुळे, तर डॉ. शास्त्री यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. ‘दोन्ही कुलगुरूंवर कोणत्याही प्रकारे दबाव नव्हता. कुलगुरूंचा राजीनामा स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार कुलपतींना असतात. दोन्ही कुलगुरूंनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला आहे,’ असे सामंत यांनी सांगितले.