करोनामुळे दरामध्येही ३० टक्क्यांची घट; ७० टक्के व्यवसाय झाल्याचा विक्रेत्यांचा दावा

मुंबई : दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून सुका मेवा देण्याची पद्धत जुनी असली तरीही सध्या करोनाकाळात मिठाईस पर्याय म्हणून जास्त काळ टिकणारा आणि आरोग्यवर्धक अशा सुक्या मेव्याला ग्राहकांची विशेष पसंती दिसून येत आहे. त्यात यंदा काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अक्रोड यांचे जगभरात उत्पादन चांगले झाले तरीही करोनामुळे विक्री मंदावल्याने दरवर्षी वाढणाऱ्या सुक्या मेव्याचे दर ३० टक्क्यांनी घटले आहेत.

दिवाळीनिमित्ताने मिठाई देण्याची परंपरा वर्षांनुवर्षे सुरू आहे. यंदा आरोग्यवर्धक सुका मेवा भेट म्हणून दिला जात आहेत. त्यामुळे यंदा सुक्या मेव्याच्या मालाला उठाव असून ७० टक्के  व्यवसाय झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ‘करोनामुळे अजूनही ग्राहक मिठाई घेण्यास कचरत आहेत. मात्र दहा दिवसांत सुक्या मेव्याच्या तीनशे बॉक्सेची विक्री झाली आहे. सरकारी कार्यालये, खासगी कं पनी तसेच व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणावर सुक्या मेव्याचे बॉक्स घेतले,’ असे मिठाई व्यावसायिक राजू शर्मा यांनी सांगितले. आक र्षक वेष्टनात बांधलेला सुक्या मेव्याचा बॉक्स देण्याकडे व्यावसायिकांचा जास्त कल दिसून येत आहे. बाजारात या बॉक्सची किं मत ३२५ ते २००० रुपयांदरम्यान आहे.

‘करोनामुळे सात महिने परदेशातून होणारी सुक्या मेव्याची आयात संपूर्णपणे बंदच होती. त्यामुळे दरवर्षी महागणाऱ्या  सुक्या मेव्याच्या किमतीत ३० टक्क्यांनी घट झाली,’ असे ओसवाल ड्रायफ्रुट्सचे नरेश शाह यांनी सांगितले.

दिवाळीत सुक्या मेव्यासोबतच चॉकलेटही भेटवस्तू दिली जाते. ‘बदाम, अक्रोड, काजू, हेजलनट या चॉकलेटना प्रचंड मागणी आहे.

फक्त महागडय़ा परदेशी चॉकलेटची फारशी विक्री न झाल्याची प्रतिक्रिया चॉकलेट विक्रेत्या शोभना सिंग यांनी दिली. करोनामुळे आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ठाण्यातील प्रशांत कॉर्नरने दिवाळीनिमित्त उच्च प्रतीचा सुका मेवा आणि सोन्याचा वर्ख लावलेल्या सुवर्ण मिठाईचा दर कमी केला आहे. गेल्या वर्षी १८,००० रुपये किलोने विक्री होणाऱ्या मिठाईच्या किमतीत यंदा घट होऊन ती १२,००० केली आहे, अशी माहिती प्रशांत कॉर्नरमधील कर्मचारी सुयोग चव्हाण यांनी दिली.

लोकल गाडय़ा नसल्याने घरपोच माल

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतरही सर्वसामान्य लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा नाही. सुक्या मेव्याचे घाऊक केंद्र मुंबईत असल्याने तेथे पोहोचण्यास सर्वसामान्य व्यक्तींना अडचणी येत आहेत. दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईतील आघाडीच्या काही सुक्या मेव्याचे व्यापारी तसेच विक्रेत्यांनी मोफत घरपोच सुविधा दिली आहे. आमच्याकडे मुंबईपेक्षा उपनगरातून जास्त ग्राहक येतात. त्यात लोकल सर्वाना सुरू नसल्याने त्यांना माल घरपोच पोहोचवत असल्याचे मस्जीद बंदर येथील सुक्या मेव्याच्या विक्रेत्यांनी सांगितले.

सध्याचे दर (प्रतिकिलो)

काजू          ८०० रुपये

बदाम          ७०० रुपये

मनुका         ४८० रुपये

अफगाणी मनुका  ६८० रुपये

अक्रोड         १६०० रुपये

पिस्ता         १००० रुपये