मुंबई : रेल्वेस्थानकांशेजारी आठपर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक देणाऱ्या मूळ विकास आराखडय़ाला जोरदार विरोध झाला असला तरी सुधारित विकास आराखडय़ात मेट्रोचे दोन मार्ग एकत्रित येत असलेल्या ठिकाणी उद्योग विकसित होण्यासाठी जास्त चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचे प्रस्तावित आहे. मेट्रो मार्ग एकमेकांना आठ ठिकाणी छेदत असून वांद्रे-कुर्ला ते अंधेरी या परिसरात यातील अधिक जागा आहेत.यामुळे आधीच गर्दी असलेल्या परिसरांवरील भार  वाढणार असल्याची भीती  आहे.

२०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मूळ प्रस्तावित विकास आराखडय़ात दादर, अंधेरी यासारख्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात आठपर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक देण्यात आला होता. यामुळे रेल्वेस्थानकालगत निवासी तसेच व्यावसायिक जागा उपलब्ध होऊन रस्ते तसेच वाहतुकीवरील भार कमी होईल, अशी संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र त्यामुळे स्थानक परिसरात प्रचंड गर्दी होण्याची भीती व्यक्त करत विरोध करण्यात आला होता. त्यामुळे सुधारित विकास आराखडय़ात जास्तीत जास्त पाच चटईक्षेत्र निर्देशांक देण्यात आला आहे. मात्र आता दोन मेट्रो मार्ग एकत्र येत असलेल्या परिसरात उद्योगांचा विकास होण्याची क्षमता लक्षात घेऊन तिथे विशेष औद्योगिक पट्टा तयार करण्याचा विचार सुरू आहे.

वाहतूक मार्गाभिमुख विकासासाठी चटईक्षेत्र निर्देशांकाची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. ही मर्यादा नेमकी किती वाढणार आहे, त्याबाबत निर्णय झाला नसला तरी इतर परिसरांपेक्षा ती निश्चितच जास्त असेल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले.

मुंबईमध्ये आधीच गर्दी असून अशा प्रकारे जास्त चटईक्षेत्र निर्देशांक दिल्याने त्यात आणखी भर पडणार असल्याने मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीला वाहतूक मार्गाभिमुख विकासाला (ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट) विरोध केला होता. मात्र मुंबईप्रमाणेच ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर  या ठिकाणीही मेट्रो परिसरात या प्रकारचा विकास करण्याबाबत राज्य सरकार आग्रही आहे.

मुंबईची स्थिती वेगळी असून  भौगोलिक क्षेत्र वाढवण्यास मर्यादा आहेत. मात्र उद्योगांसाठी वेगळा दृष्टिकोन अवलंबण्यात आला आहे, असे पालिकाअधिकाऱ्यांनी सांगितले.

* वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो-१ मार्गिकेच्या डी एन नगर स्थानकाजवळ मेट्रो २ ए (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो २ बी (डी.एन.नगर ते मंडाले) या मार्गिका जोडल्या जाणार आहेत.

* कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो-३ ची मार्गिका मेट्रो-१ च्या मरोळ स्थानकाशी जोडली जाणार आहे.

* अंधेरी (पू) ते दहिसर (पू) ही मेट्रो-७  मार्गिका मेटो-१ च्या पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकाला अंधेरी येथे जोडली जाणार आहे.

* स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी ही मेट्रो-६ आणि मेट्रो-७ ची मार्गिका जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्याजवळ एकमेकांना छेद देणार आहे.

* मेट्रो-६ ची मार्गिका मेट्रो-३ च्या अखेरच्या म्हणजेच सीप्झ या स्थानकाला जोडली जाईल.

* वडाळा-ठाणे-कासारवडवली ही मेट्रो-४ आणि मेट्रो-६ ची मार्गिका कांजुरमार्ग पश्चिम परिसरातून एकमेकांना छेदून जात आहेत.

* मेट्रो २ बी आणि मेट्रो ४ ची मार्गिका कुर्ला येथील सुमन नगर परिसरात एकमेकांना मिळत आहेत.

* मेट्रो-३ आणि मेट्रो २ बी च्या मार्गिका वांद्रे-कुर्ला संकुलाजवळील परिसरातून छेदत पुढे जाणार आहेत.

मेट्रो मार्ग छेदणारे परिसर- अंधेरी डी. एन. नगर, मरोळ, अंधेरी पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, सीप्झ, कांजुरमार्ग, सुमन नगर, वांद्रे कुर्ला संकुल.