संदीप आचार्य

मुंबई महापालिका वेळीच चाचणी आणि उपचारांवर भर देत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, तर ठाण्यात उपाययोजनांबाबत गोंधळाची परिस्थिती असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २४,९१२ आहे, तर ठाण्यात २५,३३१ एवढी आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील सहा महापालिकांमध्ये तसेच ठाणे ग्रामीण भागात करोना रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटांची कमतरता आहे. ऑक्सिजन खाटा, कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आणि डॉक्टर-कर्मचारी यांची वानवा आहे. मुख्य म्हणजे या सहाही महापालिकांमध्ये उपचारांबाबतीत समन्वयाचा अभाव आहे. नवीन रुग्ण शोधण्यासाठी पुरेशी चाचणी केंद्रे नाहीत, तसेच करोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधणारी ठोस यंत्रणाही उभारलेली नाही.

ठाण्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या मुंबईपेक्षा अधिक असून त्या तुलनेत पुरेशा उपचारसुविधा नसणे, ही गंभीर बाब असल्याचे ठाण्यातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. ठाण्यात सध्या २५,३३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या रुग्णसंख्येपेक्षा ठाण्याची रुग्णसंख्या ४१९ने अधिक आहे.

ठाण्यात गोंधळ

महापालिका अधिकाऱ्यांना ठाण्यातील खाटांची संख्या, ऑक्सिजन खाटा आणि कृत्रिम श्वसन यंत्रणा इत्यादी माहिती विचारली असता ‘थोडय़ा वेळाने सांगतो’ असे उत्तर ते देतात. ठाण्यात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यापासून सर्व संबंधितांना प्रश्न पाठवूनही माहिती मिळू शकत नाही.

मुंबईत नियोजन

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल यांना रुग्णसंख्येपासून विलगीकरण केंद्रांपर्यंतची सर्व माहिती तोंडपाठ असते. मुंबईत करोना रुग्णांसाठीच्या ४००० खाटा रिकाम्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले. रुग्णसंख्या दोन लाखांवर गेली तरी त्यांच्यावर उपचार करणारी आरोग्ययंत्रणा जुलैअखेरीस मुंबई पालिकेकडे असेल, असेही ते म्हणाले. मुंबईत एक लाख चाचण्या करण्याबरोबरच रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. खाजगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याबरोबरच रुग्णांची लूटमार होऊ नये यासाठी पथके कार्यरत असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

चोवीस तासांत २२ हजार नवे बाधित

नवी दिल्ली, मुंबई : गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात करोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली. दिवसभरात २२ हजार ७७१ करोना रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ४८ हजार ३१५ झाली आहे. १ जूनपासून ४ लाख ५७ हजार ७८० लोकांना करोनाची बाधा झाली.  शनिवारी मुंबईत आणखी ११८० नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका दिवसात राज्यात

७०७४ रुग्ण आढळले. राज्यात अवघ्या २० दिवसांमध्ये एक लाखांपेक्षा अधिक रुग्णांची भर पडली. राज्यातील करोनाबधितांची  संख्या ही दोन लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

उपाययोजनांबाबत संभ्रम :  ठाणे जिल्ह्य़ात करोना रुग्णांचा आणि बळींचा आकडा वेगाने वाढत असताना नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत? रुग्ण संपर्क शोधमोहीम कशी राबवली जात आहे किंवा जाणार आहे? याची माहिती ना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली, ना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी. मुंबईत करोनाचे एकूण ८२,०७४ रुग्ण आहेत, तर ठाण्यातील रुग्णसंख्या ४३,६३४ झाली आहे. ठाण्यातील करोनाबळींची संख्या १०७५ एवढी आहे.