अनेक ठिकाणी ‘क्लीनअप मार्शल’ तैनात; श्वानपालन परवान्यासोबत विष्ठा उचलण्याचे उपकरण बंधनकारक?

श्वानांच्या विष्ठेमुळे मरिन ड्राइव्हसह मुंबईतील अनेक उच्चभ्रू वस्त्यांचे परिसर मलिन होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करताच मुंबई महापालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. मरिन ड्राइव्हच्या पदपथांवर होणारे असे प्रकार रोखण्यासाठी या ठिकाणी जास्त संख्येने ‘क्लीनअप मार्शल’ तैनात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर श्वानपालनाचा परवाना देताना श्वानांची विष्ठा उचलण्याचे उपकरण खरेदी करणेही बंधनकारक करण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे.

पाळीव श्वानांना फेरफटक्यासाठी नेण्याच्या निमित्ताने त्यांचे मलमूत्रविसर्जनही रस्त्यावर उरकण्याकडे अनेकांचा कल दिसतो. या प्रवृत्तीमुळेच मरिन ड्राइव्ह तसेच मंत्रालय परिसरातील पदपथांवर जागोजागी श्वानांची विष्ठा दिसून येते. पालिकेच्या विभाग कार्यालयाने रस्त्यावरील श्वानांची विष्ठा उचलण्यासंदर्भात जनजागृती करूनही ही प्रवृत्ती कायम आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’ने प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे. मरिन ड्राइव्ह येथील श्वानविष्ठेच्या तक्रारी वाढल्याने आता या भागात कारवाई तीव्र करण्यात येत असल्याची माहिती ए वॉर्डचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. ‘‘कुत्र्यांची विष्ठा उचलण्यासाठी ‘शीट लिफ्टर’ उपकरण आहे. हे उपकरण वापरून विष्ठा उचण्याचे प्रशिक्षण वॉर्डमधील श्वानमालकांना तसेच त्यांच्या श्वानाला सांभाळणाऱ्यांना देण्यात आले होते. हे उपकरण असल्यावरच श्वानांसाठी परवाना द्यावा व भविष्यात विष्ठा न उचलताना पकडले गेल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे,’’ अशी माहिती डी वॉर्डचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.

पाश्चिमात्य देशात श्वानांच्या पार्श्वभागी क्लिपने लावता येण्याजोग्या पिशव्या उपलब्ध आहेत. श्वानाने विष्ठा टाकल्यावर त्या पिशव्या काढून सार्वजनिक कचरा डब्यांमध्येही टाकता येतात. या पिशव्या जैवविघटनशील असतात. श्वानांच्या राहण्याखाण्यावर खर्च करणाऱ्यांना हा खर्च फार वाटणार नाही, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. श्वानमालक लेप्टोची लस देत असल्याने तसेच मरिन ड्राइव्हला पाणी साचत नसल्याने लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरण्याचा धोका नसला तरी विष्ठा उघडय़ावर राहिल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतातच, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

शहरभर समस्या

कुत्र्यांच्या विष्ठेबाबत मरिन ड्राइव्ह, गिरगाव, ताडदेव परिसरांत अधिक तक्रारी येत असल्या तरी संपूर्ण शहरातच पाळीव कुत्र्यांच्या मालकांमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विलेपार्ले येथील पदपथांवर कुत्र्यांची विष्ठा पसरलेली असते. त्यामुळे पदपथ चालण्यासाठी आहे की कुत्र्यांच्या विष्ठेसाठी राखून ठेवले आहेत, ते कळेनासे झाले आहे. पदपथावरून चालणे ही शिक्षा असते, असे डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले. कांदिवली येथील ठाकूर संकुलामध्येही कुत्र्यांच्या विष्ठेमुळे स्थानिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.