मध्य रेल्वेवर ६०, पश्चिम रेल्वेवर ५६ नवे जिने;  कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचीही मदत

प्रवाशांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा देण्याचा संकल्प केलेल्या रेल्वे मंत्रालयाने आता मुंबईच्या उपनगरीय स्थानकांवर जास्तीत जास्त सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षभरात पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर १००हून अधिक सरकते जिने बसवण्यात येणार असून त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त सरकत्या जिन्यांसाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेतली जाणार आहे. यात मध्य रेल्वेवर ६० आणि पश्चिम रेल्वेवर ५६ नवे सरकते जिने बसवले जातील. सध्या मध्य रेल्वेवर १५ आणि पश्चिम रेल्वेवर २६ सरकते जिने विविध स्थानकांवर कार्यरत आहेत.

मध्य रेल्वेने यंदा स्वत:च्या खर्चातून सात स्थानकांवर १९ सरकते जिने बसवण्याचे नियोजन केले आहे. त्याशिवाय एमआरव्हीसीकडून मध्य रेल्वेवर १६ नवीन सरकते जिने बसवले जाणार आहे. नुकतेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या करारानुसार ‘वेस्टर्न कोल फिल्ड्स लि.’ ही कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधीपोटी मुंबईत ३० कोटी रुपये देणार आहे. या निधीतून ३० नवीन सरकते जिने बसवण्यात येणार असून त्यापैकी २५ जिने मध्य रेल्वेवर बसवले जातील. म्हणजेच मध्य रेल्वेवर यंदाच्या वर्षांत नव्याने बसवण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्यांची संख्या ६० असेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी     नरेंद्र पाटील यांनी दिली. पश्चिम रेल्वेही सरकत्या जिन्यांसाठी आग्रही असून येत्या वर्षभरात ३१ जिने पश्चिम रेल्वे व एमआरव्हीसी यांच्यातर्फे बसवले जाणार आहेत. त्याशिवाय कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून २५ नवीन सरकते जिने बसवण्याची योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे. त्यापैकी पाच जिने आता ‘वेस्टर्न कोल फिल्ड्स लि.’द्वारे दिलेल्या निधीतून बसवले जाणार आहेत. त्यामुळे नव्या सरकत्या जिन्यांची संख्या ५६ एवढी आहे. वर्षभरात मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील उपनगरीय स्थानकांवर ११६ नवीन सरकते जिने बसवले जाणार आहेत.

नवे सरकते जिने

मध्य रेल्वे : सीएसटी (२), भायखळा (२), चेंबूर (२), पनवेल (२), बदलापूर (२), कर्जत (२), चिंचपोकळी, परळ, माटुंगा, शीव, नाहूर, मुलुंड, कळवा, मुंब्रा, दिवा, शिवडी, टिळकनगर, टिटवाळा आणि कसारा (प्रत्येकी एक). पश्चिम रेल्वे : लोअर परळ (२), एल्फिन्स्टन रोड (१), माटुंगा रोड (२), वांद्रे (२), सांताक्रूझ (२), मालाड (१), कांदिवली (२), दहिसर (२), भाईंदर (२), नायगाव (२), वसई रोड (२), नालासोपारा (३) आणि विरार (२).

एक सरकता जिना बसवण्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च येतो. त्यात ७५ लाख रुपये हे त्या सरकत्या जिन्यासाठी आणि २५ लाख रुपये विद्युत प्रणालीसाठी लागतात. यापुढेही कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्यासाठी केला जाईल.

– नरेंद्र पाटील,  मध्य रेल्वे