मुंबईत काल संध्याकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रस्त्यावरील वाहतूक मंदावली असून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवाही कोलमडली आहे. दरवर्षी काही तासांच्या मुसळधार पावसानंतर मुंबई आणि लगतच्या परिसरात अशीच स्थिती निर्माण होते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही.

पावसाची संततधार सुरु असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या १० तासात मुंबई शहरात २३० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. २६ ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्यामुळे एकूण ५६ मार्गावर बेस्टने बसेसचे मार्ग बदलले आहेत.

आणखी वाचा- मुंबईत मुसळ’धार’, अतिवृष्टीचा इशारा

रेल्वे रुळावर पाणी आल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे ते चर्चगेट दरम्यान लोकल सेवा बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरही लोकल वाहतूक मंदगतीने सुरु आहे. करोना व्हायरसमुळे अजूनही सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नाही. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सेवा सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल सेवा ठप्प होण्याचा जास्त मोठया प्रमाणावर फटका बसणार नाही. कारण सध्या मोठ्या प्रमाणात घरातूनच वर्क फ्रॉम होम सुरु आहे.

मुंबईत आता अनलॉक तीनचा फेज सुरु आहे. दुकाने, कार्यालये सुरु असल्यामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ असते तसेच वाहनांची संख्यादेखील वाढली आहे.

आणखी वाचा- आज घरीच थांबा, अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे मुंबई महापालिकेकडून आवाहन

महापालिकेकडून घरी थांबण्याचे आवाहन
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. समुद्रात दुपारी १२.४७ च्या सुमारास भरती येणार आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.