नवीन कक्षातील वातावरण प्रजननाला पोषक असल्याचा दावा

भायखळ्याच्या राणी बागेतील सुमारे २५० चौरस फुटांच्या तात्पुरत्या निवासातून (क्वारंटाइन) तब्बल १८०० चौरस फुटांच्या प्रशस्त कक्षात वास्तव्याला गेलेल्या हॅम्बोल्ट पेंग्विनना पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी एकीकडे उसळत असतानाच, हे सात पेंग्विन आपल्या नव्या घरात निर्धास्तपणे वावरताना दिसत आहेत. प्रशस्त आणि अनुकूल कक्षाची हवा पेंग्विनना मानवू लागली असून त्यांच्या आहारासोबत जलविहारातही वाढ झाली आहे. तसेच या सातपैकी चार पेंग्विननी आपापला जोडीदार शोधला असून त्यांचा अख्खा दिवस जोडीदारासमवेतच जात आहे. या पाश्र्वभूमीवर येत्या वर्षभरात राणीच्या बागेतील या कक्षात चिमुकल्या पेंग्विनच्या रूपात नवीन पाहुण्याची भर पडेल, असा विश्वास या पेंग्विनची निगा राखणाऱ्या पथकाने व्यक्त केला आहे.

पेंग्विन कक्ष खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हजारो मुंबईकरांनी त्यांच्या दर्शनाकरिता येथे गर्दी केली. रविवारी तर ही गर्दी २० हजारावर गेली. या गर्दीमुळे पेंग्विनच्या दिनक्रमात काहीसा खंड पडला असला तरी, ‘क्वारंटाइन’ कक्षात असतानापासून तयार झालेल्या जोडीदारासोबत त्यांचा नवीन कक्षात मुक्त जलविहार सुरू आहे. नवीन घरात येण्याआधीच पेंग्विनच्या डोनल्ड-डेझी, ऑलिव्ह-पॉपाया अशा दोन जोडय़ा तयार झाल्या होत्या. ते एकमेकांना चाटतात आणि वेगवेगळे आवाजही काढतात. आणखी काही दिवसांत नवीन परिसराला हे चौघे जण रुळले की त्यांच्यात संबंध निर्माण होऊन येत्या वर्षभरात पाळणाही हलू शकतो, असे   पेंग्विनच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या पशुवैद्यक डॉ. मधुमिता काळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. पेंग्विनमध्ये संबंध आल्यानंतर साधारण दीड महिन्यांच्या काळानंतर मादी पेंग्विन अंडी देते. एका वेळी मादी पेंग्विन दोन अंडी देते. या पेंग्विनचे वैशिष्टय़ म्हणजे एकदा निवडलेला साथीदार ते कधीच सोडत नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

नवीन घरी आल्यामुळे हे सातही पेंग्विन सध्या खूप आनंदात आहेत. पोहायला मोठी जागा मिळाल्यामुळे ते दिवसभर खेळत असतात. खूप पोहतात. पोहण्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे त्यांना भूकही खूप लागते, अशी माहिती डॉ. काळे यांनी दिली. डॉ. काळे यांच्यासह डॉ. नेहा शहा, डॉ. गणेश अटोळे आणि डॉ. गोविंद मांगनळे हे चार पशुवैद्यक चोवीस तास या पेंग्विनची काळजी घेत असतात. पेंग्विनना खेळण्याकरिता पाण्यात चेंडू ठेवण्यात आले आहेत. त्याच्याशी खेळून त्यांना कंटाळा आला की, अनेकदा डॉक्टरांना त्यांच्यासमवेत खेळावे लागते.

पेंग्विनची तऱ्हा

* या संवेदनशील पक्ष्यांना गर्दी, गोंगाट चालत नाही.

* त्यांच्याशी आपलेपणाने, प्रेमाने वागले, की ते आपल्या सूचनांचे पालन करतात.

* कोणी त्यांच्याशी रागाने बोलत असेल तर ते निघून जातात आणि त्या व्यक्तीकडे पुन्हा जात नाहीत.

* सुरुवातीच्या काळात एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर अन्य पेंग्विन कित्येक दिवस आरडाओरड करून आपली अस्वस्थता दर्शवित होते.