मुंबई : सुपर आणि विंटेज प्रकारातील ४००हून अधिक दुर्मीळ गाडय़ा एकाच ठिकाणी पाहण्याची संधी  ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान मुंबईकरांना मिळणार आहे. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनच्या शतकमहोत्सवी वर्षांच्या निमित्त प्रदर्शन आणि वाहनफेरी आयोजित करण्यात आली आहे. भारतातील हे अशाप्रकारचे पहिलेच प्रदर्शन असणार आहे.

विंटेज गाडय़ा आपल्या खास रचनेसाठी आणि शैलीसाठी ओळखल्या जातात. तसेच सुपर गाडय़ांमध्ये तंत्रज्ञानाची नवलाई पाहायला मिळते. सुपर, विटेंज कार आणि बाइक्सचे हे प्रदर्शन वांद्रे कुर्ला संकुलात भरविण्यात आले आहे. शुक्रवार ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शन आणि रविवारी १० फेब्रुवारी रोजी वाहनांची फेरी होणारआहे.

रविवारी सकाळी ११.३० वाजता बीकेसी येथून गाडय़ांची परेड सुरू होणार असून तिचा बॅलार्ड पिअर येथे समारोप होईल. ४०० हून अधिक महागडय़ा गाडय़ा दिसणार आहेत, अशी माहिती सुपर कार क्लबचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी दिली. या कार्यक्रमासाठी गेल्या वर्षांपासून तयारी केली जात आहे. या सर्व गाडय़ा चालू स्थितीतल्या आणि दुर्मीळ आहेत. सर्वात जुन्या १८८५ च्या मर्सिडीजचाही समावेश आहे, अशी माहिती विंटेज आणि क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दोसा यांनी दिली.

ऑडी, मर्सिडीज, मॅसेटरी, लंम्बोर्गिनी, अस्टन मार्टन, पोर्श, फेरारी, बेंटाले, रॉल्स रॉईज अशा महागडय़ा गाडय़ा पाहता येणार आहेत. पार्क्‍स कं पनीतर्फे या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे.