केवळ २२ करोना चाचणी प्रयोगशाळा; उच्च न्यायालयातील राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र

मुंबई : मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ४० हजारांच्या वर गेली असून लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईत सध्या करोनाचाचणीच्या केवळ २२ प्रयोगशाळा कार्यरत असल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली. सध्या राज्यातील १२ जिल्ह्य़ांत एकही प्रयोगशाळा नसल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

रत्नागिरी येथे करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करताना राज्य सरकारने अ‍ॅड्. मनीष पाबळे यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. यापूर्वीही सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करत रत्नागिरी येथे करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याची माहिती देतानाच प्रत्येक जिल्ह्य़ात करोना चाचणी प्रयोगशाळेची आवश्यकता नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. न्यायालयाने त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्य़ात किती करोना चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, याचा तपशील सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते.

राज्य सरकारने मंगळवारी त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करत त्यात प्रत्येक जिल्ह्य़ाची लोकसंख्या, ३१ मेपर्यंतची तेथील करोनाबाधितांची, संशयितांची आणि किती करोना चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत, या प्रयोगशाळांमध्ये दिवसाला किती चाचण्या घेतल्या जातात इत्यादींचा सविस्तर तपशील सादर केला आहे.

त्यानुसार मुंबईची लोकसंख्या एक कोटी २९ लाख ४४ हजार ९२२ असून ३१ मेपर्यंत मुंबई ३९ हजार ६८६ जण करोनाबाधित, तर आठ ८६ हजार ६५३ जण करोना संशयित आहेत. तर २२ करोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत असून त्यात १० सरकारी व १२ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

पुण्याची लोकसंख्या ही १ कोटी १४ लाख ७४ हजार ३३५ एवढी असून तेथे ७ हजार ९१९ करोनाबाधित, १ लाख ७ हजार ४७० करोना संशयित आहे, तर १९ करोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

या सगळ्या करोना चाचणी प्रयोगशाळांची दिवसाला ३५ हजार नमुने घेण्याची क्षमता असून त्यात सरकारी प्रयोगशाळमंत १५ हजार, तर खासगी प्रयोगशाळांत २० हजार नमुने चाचणीसाठी घेतले जाऊ शकतात. एका नमुन्याच्या चाचणीला सहा तास लागतात. त्यामुळे दिवसाला ४५ ते ५० नमुन्यांची चाचणी केली जाते, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

ठाणे

ठाण्याची लोकसंख्या १ कोटी २७ लाख ८ हजार २६५ असून ठाण्यात सद्य:स्थितीला ९ हजार ५८५ करोनाबाधित, २७ हजार ९५० करोना संशयित आहेत, तर केवळ सहा करोना चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यात एक सरकारी व उर्वरित पाच या खासगी आहेत.

पालघर

पालघरची लोकसंख्या ही ३५ लाख २ हजार ३५१ असून जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या १ हजार १८, करोना संशयितांची संख्या ५ हजार ८७२, तर केवळ एकच सरकारी करोना चाचणी प्रयोगशाळा आहे.