तळीराम चालकांवर कारवाईचा बडगा

दारू पिऊन वाहन चालविणे गुन्हा असतानाही अनेक वाहन चालक या नियमाकडे कानाडोळा करतात. नियम मोडणाऱ्या अशा तळीराम चालकांवर कारवाईचा बडगा आरटीओकडून उचलण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात एकूण ४० हजार १७६ वाहन परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. २०१७ पेक्षा २०१६ या वर्षांत मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा आहे. तरीही बिनदिक्कतपणे वाहनचालक दारू पिऊन वाहन चालवितात. यामध्ये तर काही वेळा अपघातांचाही धोका संभवतो. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते. त्यांच्याकडील असणाऱ्या ब्रिद अ‍ॅनलायझरने वाहन चालकाची तपासणी होते. यात दारूचे प्रमाण ३० मिली ग्रॅमपेक्षा जास्त आढळल्यास तळीराम चालकावर कारवाईसाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडली जाते.

आरटीओकडून करण्यात आलेल्या कारवाईत वाहन परवाना जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी निलंबित केला जातो. त्याआधी या वाहनचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावतो आणि त्याचे म्हणणे ऐकून घेतो. मात्र अशा प्रकरणात वाहन चालक हे पुढे येतच नाहीत. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याने परवाना निलंबनाशिवाय पर्याय नसतो, असे सूत्रांनी सांगितले.