९१७ वस्त्यांजवळ शाळा नसल्याचे वास्तव उघड

मुंबई : एकीकडे शालेय शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाल्याचे चित्र रंगविले जात असतानाच, दुसरीकडे मात्र राज्यातील साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आजही पायपीट करावी लागत आहे. वस्तीपासून शाळेचे अंतर आणि विद्यार्थ्यांसाठीच्या वाहतूक सुविधांचा आढावा नुकताच शिक्षण विभागाने घेतला. त्यामधून ही माहिती समोर आली आहे. यावर उपाय म्हणून शाळेसाठी दूरवर प्रवास करावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा किंवा भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्यातील ९१७ वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या वाटय़ाला शिक्षणासाठीचे हे कष्ट आले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) ही एक किलोमीटरच्या परिसरात, तर माध्यमिक शाळा (सहावी ते आठवी) ही तीन किलोमीटरच्या परिसरात असणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात काही ठिकाणी १० ते १५ किलोमीटरच्या परिसरात शाळा नाहीत, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरपेक्षा दूरवरील शाळेत जावे लागते, त्यांना वाहतुकीची सुविधा किंवा भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ४ हजार ८७५ विद्यार्थ्यांना हा भत्ता किंवा सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१७ किलोमीटरवर शाळा नाही

बुलढाणा जिल्ह्य़ातील देवहरी येथील ५ विद्यार्थ्यांना १७ किलोमीटरवरील शाळेत जावे लागत आहे. कारण जवळील शाळेत पाचवी ते आठवीचे वर्ग नाहीत. नांदुरा तालुक्यातील पोटा येथे ४ विद्यार्थ्यांना १२ किलोमीटरवरील शाळेत जावे लागते. अशीच परिस्थिती हानवटखेड, खामगाव तालुक्यातील घरोड येथे असून तेथील विद्यार्थीही १० किलोमीटर प्रवास करतात. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील मांडवे वस्तीपासून १५ किलोमीटरच्या परिसरात शाळाच उपलब्ध नाही. या वस्तीवर पहिली ते आठवीपर्यंतचे १० विद्यार्थी आहेत. कोपरे वस्तीवरही १ विद्यार्थी असून त्यालाही १३ किलोमीटर अंतरावरील शाळेत जावे लागते. मुळशी तालुक्यातील देवघर येथेही एक विद्यार्थी १२ किलोमीटर अंतरावरील शाळेत जातो. नाशिक जिल्ह्य़ातील सराष्टे वसती, उस्मानाबाद येथील शिरढोण येथेही विद्यार्थ्यांना दहा किलोमीटरवरील शाळेत जावे लागते.

विद्यार्थी आहेत, पण शाळा नाहीत..

कमी पटसंख्येचे कारण देत विभागाने शाळा बंद केल्या. मात्र काही भागांत ४० विद्यार्थी असूनही नव्या शाळा मात्र सुरू झाल्या नाहीत. ज्या भागांत वीसपेक्षा अधिक विद्यार्थी असतील तेथे नवी शाळा सुरू करण्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे. मात्र अजूनही अनेक वस्त्यांच्या परिसरात शाळा सुरू झालेल्या नाहीत. बारामती येथील कान्हेरी वस्ती येथे ४३, पानसावेवाडी ३५, मनप्पा वस्ती येथे २० विद्यार्थी आहेत. मात्र या वस्त्यांवर शाळा नाही. दौंड येथील पानवली येथेही ४० विद्यार्थी असून शाळा सुरू झालेली नाही. बुलढाणा येथील चालठाण (३४), बुरटी (२९), धुळे येथील आंबोडे (३२), आरणी (३०), खोरदड (२६), मुखेड (२७), कोल्हापूर येथील मराळे (२३), सोलापूर येथील कदबगाव (३७), वाशिम येथील टाकमोर (२८) येथे वीसपेक्षा अधिक विद्यार्थी असूनही शाळा सुरू झालेल्या नाहीत.

शाळा बंदीबाबत स्पष्टता नाही :  दूरच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी अद्यापही वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाबाबत संदिग्धता आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार का, हा प्रश्न कायम आहे. त्याचप्रमाणे जेथे पटसंख्या जास्त आहे तेथे नव्या शाळा सुरू करण्याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.