उमाकांत देशपांडे

करोना टाळेबंदीत थंडावलेले मालमत्ता खरेदी-विक्री, भाडेकरार व्यवहार सुरळीत झाले नसून अद्याप निम्माही टप्पा गाठला गेलेला नाही. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांतील प्रत्येक महिन्याच्या मुद्रांक शुल्काच्या उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक घट आहे.

करोना टाळेबंदीचा देशभरातच मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या तीन वर्षांत राज्याला मुद्रांक शुल्कातून सुमारे २८ लाखांहून अधिक दस्तनोंदणीतून सुमारे २८-२९ हजार कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळाले होते.

चालू आर्थिक वर्षांत १५ जुलैपर्यंत म्हणजे साडेतीन महिन्यांमध्ये दोन हजार ५४० कोटी ३४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुमारे एक लाख ९४ हजार दस्तनोंदणी झाली आहे.

त्यापैकी एप्रिल २० मध्ये ११३९ दस्तनोंदणीतून २७३ कोटी रुपये, मे महिन्यात ३९७६९ दस्तनोंदणीतून ४१५ कोटी रुपये मिळाले आहेत. टाळेबंदी शिथिल झाल्यावर हळूहळू दस्तनोंदणी वाढून जूनमध्ये एक लाख ५३ हजार दस्तनोंदणीतून १२६१ कोटी रुपये तर १५ जुलैपर्यंत ५९२ कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती महसूल खात्याच्या उच्चपदस्थांनी दिली.

आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू झाले असले तरी मालमत्तांच्या व्यवहारांमध्ये अजून गती आलेली नसून पुढील काही महिनेही टाळेबंदीचे आर्थिक परिणाम जाणवणार आहेत. त्याचा फटका साहजिकच मुद्रांक शुल्काच्या उत्पन्नाला बसणार असल्याचे उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.