भरमसाट जागा आणि त्या तुलनेत विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याने राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत यंदाच्या वर्षी ५० हजारांहून अधिक जागा रिकाम्या राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हादरलेल्या महाविद्यालय व्यवस्थापनांनी शिष्यवृत्ती देऊन किंवा शुल्कासाठी हप्ते बांधून देऊन विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचण्याची शक्कल लढवली आहे.
अभियांत्रिकीच्या सुमारे पावणेदोन लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी शासनामार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून तिसऱ्या फेरीनंतरही सुमारे ५० हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर खासगी महाविद्यालये आहेत. प्रत्येक विभागात पाच-सहा नामांकित महाविद्यालयांमध्येच ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर उर्वरित महाविद्यालयांमध्ये ४० ते ८० टक्केच जागा यंदा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी कुठून मिळवायचे, असा प्रश्न काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांना पडला आहे. दरम्यान, चौथी प्रवेश फेरी राबवण्याची मागणी तंत्रशिक्षण संचलनालयाने राज्य सरकारकडे केली असून त्यावर निर्णय झालेला नाही.
काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल असल्याने प्रवेश देण्यासाठी देणग्यांच्या नावाखाली महाविद्यालये त्यांच्या पालकांकडून आठ-दहा लाख रुपये उकळत असत. मात्र, आता चित्र पालटले आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती केली जात होती. मात्र, एखाद्याची ऐपत नसेल, तर हप्त्याने शुल्क भरण्याची सवलतही काही महाविद्यालयांनी देऊ केल्याचे चित्र आहे. शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्याचा मार्गही काहींनी अनुसरला आहे.
विद्यापीठानुसार अभियांत्रिकीच्या रिक्त जागा
पुणे विद्यापीठ : १५,२०१
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : ८, ८६२
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : ५,९३४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : ४,२०२
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : ३,९७२
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : ३,२८५
सोलापूर विद्यापीठ : ३,५६७
मुंबई विद्यापीठ : ३,२४१
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ : १,५७१
गोंडवाना विद्यापीठ : ७६८