राज्यात ६०० च्या वर नोंदणीकृत प्रकाशक आहेत. त्यातील २०० प्रकाशक नियमित पुस्तक प्रकाशन, विक्री करतात. पुस्तकांचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या महिनाभरात करोना संसर्गाच्या भीतीने पुस्तक विक्री घटून ललित पुस्तक विक्रीत १५ ते २० कोटींचा फटका बसला. यातून सावरण्यासाठी कागदाचे दर नियंत्रण, जीएसटी, आयकरात सूट, शाळा, महाविद्यालयातून पुस्तक खरेदी, ग्रंथालय अनुदानात वाढ आदी उपाय प्रकाशकांनी सुचवले आहेत.

वाचन आणि ग्रंथखरेदीतील मरगळ सावरण्यासाठी  पुण्यातील आघाडीच्या आठ पुस्तक विक्रेत्यांनी एकत्र येत ‘वाचक जागर’ उपक्रम राबवला. त्यातून थेट वाचकांपर्यंत पुस्तके व लेखकांना नेऊन व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न केले. वाचक टिकवण्यासाठी पुस्तकांच्या किमती आटोक्यात आणून व समाजमाध्यमांचा वापर करून वाचकांना आकर्षित करावे लागेल, त्यादृष्टीनेही काहींचे प्रयत्न सुरू आहेत. सवलतींच्या योजनांशिवाय पर्याय नसल्याने तो पर्यायही सातत्याने वापरला जात आहे.

काय म्हणतात प्रकाशक?

नोटबंदीनंतर आधीच अडचणीत आलेल्या प्रकाशन व्यवसायाला आता करोना विषाणूचे ग्रहण लागले आहे. कार्यालय, पुस्तके ठेवण्याच्या गोदामाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार हे खर्च समोर आहेत. १४ एप्रिलनंतर सुरळीत होईल असे गृहीत धरले तरी बाजारपेठेमध्ये उदासीनता आली आहे. त्यामुळे याची शिक्षा बराच काळ भोगावी लागणार आहे. प्रकाशन व्यवसायाला चैतन्य प्राप्त होण्यासाठी बहुधा दिवाळीची वाट पहावी लागेल असे वाटते.

– अरुण जाखडे (पद्मगंधा प्रकाशन)

सध्या टाळेबंदीमुळे दुकाने बंद आहेत. त्यामुळे पुस्तकविक्री होत नाही. शिवाय आमच्याकडे ऑनलाईन विक्रीचीही सोय नाही. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होते आहे. वाचकांच्या वाचनाच्या सवयी बदलल्या असल्याने एरव्हीही मराठी पुस्तकांचा खप ३० ते ३५ टक्क्यांनी घटला आहे. तरीही नव्या पुस्तकांचे संपादन घरबसल्या सुरूच आहे.

– श्रीकांत भागवत  (मौज प्रकाशन)

करोना विषाणूच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर सावरण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी जावा लागेल. तोपर्यंत पावसाळा सुरू होईल. हे ध्यानात घेता प्रकाशन व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी सर्व प्रकाशकांनी एकत्र येत वाचन जागरच्या धर्तीवर संयुक्तपणे प्रयत्न करून वाचकांना पुस्तके खरेदीसाठी सवलत देण्यासारखे उपक्रम राबवावे लागतील.

– अरविंद पाटकर (मनोविकास प्रकाशन)

आमची अनेक प्रकाशने थांबली आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्यावर आधारित एक अंक प्रकाशित करायचा होता. त्याची सर्व तयारी झाली होती. पण अचानक टाळेबंदी लागू झाली. ललित मासिकाचा अंकही निघू शकला नाही. मार्च-एप्रिलचा जोड अंक काढू, असा विचार होता. पण तेही होऊ  शकले नाही. दुकाने बंद असल्याने पुस्तक विक्रीही थांबली आहे.  खरेतर सध्या वाचकांना पुस्तकांची गरज आहे. त्यांच्याकडे आधीपासूनच असलेली पुस्तके वाचक सुट्टीत वाचून संपवतील आणि दुकाने सुरू झाल्यावर नवीन पुस्तके खरेदी करतील अशी आशा आहे.

– अशोक कोठावळे  (मॅजेस्टिक प्रकाशन)