१४ दिवसांमध्ये दीड हजार इमारतींची भर

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने मुंबईमधील तब्बल सहा हजारांहून अधिक इमारती टाळेबंदीच्या कचाटय़ात सापडल्या आहेत. अवघ्या १४ दिवसांमध्ये टाळेबंद केलेल्या इमारतींच्या यादीत दीड हजार इमारतींची भर पडली आहे. या सर्व इमारतींमधील ४७.३० लाखांहून अधिक रहिवाशांवर र्निबधांची तलवार लटकत आहे.

इमारतीमध्ये करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी ती पूर्णत: अथवा अंशत: टाळेबंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे ९ जून रोजी चार हजार ५४८ इमारतींपैकी काही पूर्णत: तर काही अंशत: टाळेबंद करण्यात आल्या. या इमारतींमध्ये नऊ हजार ९५६ रुग्ण आढळले होते. या इमारतींमध्ये एक लाख ८० हजार १८७ घरे असून तेथे आठ लाख दोन हजार ७३० रहिवासी वास्तव्यास होते. अवघ्या १४ दिवसांमध्ये तब्बल एक हजार ५७८ इमारतींमध्ये चार हजार ६१६ रुग्ण आढळून आले. त्यामुळे टाळेबंद केलेल्या इमारतींची

संख्या सहा हजार ११६ वर पोहोचली आहे. या सहा हजार ६१६ इमारतींमध्ये दोन लाख ४३ हजार २९० घरे असून तेथील रहिवाशी संख्या १० लाख ३७ हजार एक इतकी आहे.

३३ ठिकाणे वगळली

एकीकडे रुग्ण सापडत असल्यामुळे टाळेबंद इमारतींची संख्या वाढत असताना दुसरीकडे अवघ्या १४ दिवसांमध्ये करोनामुक्त झालेली ३३ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. आजघडीला मुंबईत ७६५ प्रतिबंधित क्षेत्रे असून या क्षेत्रांमध्ये २४ हजार ११२ करोनाबाधित रुग्ण आहेत. या भागांमध्ये रुग्ण सापडल्यामुळे ४७ लाख ३० हजार ४३४ रहिवाशांना र्निबध पाळावे लागत आहेत. ९ जून रोजी मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७९८ होती.