महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या पाहणीतील निष्कर्ष

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : एकीकडे बेघर, बेरोजगारांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत असताना दुसरीकडे मुंबईत मोठय़ा प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये टाकून देण्यात आलेल्या खाद्यपदार्थाचे प्रमाण ७२ टक्क्यांहून अधिक असल्याचे आढळून आले आहे.ओल्या सेंद्रिय कचऱ्याचा वापर खतनिर्मितीसाठी करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये दर दिवशी सुमारे ६५०० ते ६८०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. पालिकेचे सफाई कामगार भल्या पहाटे मुंबई झाडून स्वच्छ करतात. साफसफाईदरम्यान गोळा होणारा कचरा एका ठिकाणी जमा केला जातो आणि कचरावाहू गाडय़ांमधून तो कचराभूमीपर्यंत वाहून नेला जातो. यातील सुका कचरा वर्गीकरण केंद्रांमध्ये नेण्यात येतो. त्यापैकी काही कचरा पुनर्वापरासाठी पाठविला जातो. कचरावाहू वाहनांच्या १,६७६ फेऱ्यांद्वारे हा कचरा कचराभूमीत टाकण्यात येत आहे.

मुंबईकरांच्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले असून त्यात ७२.६० टक्के अन्नपदार्थ असतात. पंचतारांकित आणि अन्य हॉटेलमधून मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होतो. यात अन्नपदार्थाचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असतो. त्याचबरोबर निवासी भागातूनही मोठय़ा प्रमाणावर अन्नपदार्थ कचऱ्यात टाकण्यात येतात. त्यामुळे ओल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक असते, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारत बांधकाम आणि विकास प्रकल्पांच्या कामांमुळे मोठय़ा प्रमाणावर दगड, बारीक माती, वाळू आदी कचरा निर्माण होत आहे. त्याचे प्रमाण प्रतिदिन १७.३७ टक्के असते. तर ३.५१ टक्के लाकूड, कापड (कोरडा कचरा), ३.२४ टक्के प्लास्टिक, ३.२८ टक्के कागद व पुनर्वापरायोग्य कचरा (धातूसह) आढळून आला आहे.

कांजूर कचराभूमीवर ७५ टक्के  कचरा

मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मुंबईत निर्माण होणारा कचरा देवनार आणि कांजूर कचराभूमीत टाकण्यात येत आहे. यापैकी २५ टक्के कचरा देवनार, तर ७५ टक्के कचरा कांजूर कचराभूमीत टाकण्यात येत असून तेथे त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येतो. देवनारच्या १२० हेक्टर जागेवर ८८ वर्षे कचरा टाकण्यात येत आहे. प्रतिदिन हे प्रमाण १२०० ते १७०० मेट्रिक टन आहे. तर कांजूरमध्ये प्रतिदिन ४५०० ते ५५०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात येत असल्याने तेथे कचरा टाकणे बंद करण्यातआले.