डॉ. अन्वय यांच्यामुळे अनेक रुग्ण ठणठणीत
संदीप आचार्य, लोकसत्ता
मुंबई: पाच वर्षांंपूर्वी २२ वर्षांंच्या सलीम खानवर ( नाव बदलून) हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. सलीमची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियाहोण्यापूर्वी असाच एक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा प्रयत्न ४७ वर्षांंपूर्वी मुंबईतील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात झाला होता. तो यशस्वी ठरला नाही. त्यानंतर चार दशकांनी विख्यात हृदय शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी मुलुंडच्या फोर्टिज रुग्णालयात यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.
आतापर्यंत डॉ. मुळे यांनी ११० यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि आणि चार हजारांहून अधिक बायपास शस्त्रक्रिया केल्या.
देशात डॉ. मुळे यांच्या या शस्त्रक्रियेचे कौतुक झाले. ते एक आव्हान होते. सामान्यपणे कोणतीही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे एक आव्हानच असते. सलीम आज २७ वर्षांंचा झाला असून आता तो नियमित काम व व्यायाम करतो आहे. या शस्त्रक्रियेचा हा प्रवास चित्तथरारक होता. सलीमच्या हृदयाची धडधड कोणत्याही क्षणी बंद पडेल, अशी परिस्थिती होती. हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय त्याच्यासाठी शिल्लक होता. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ब्रेनडेड रुग्णाचे हृदय मिळण्याचे प्रयत्न सुरू होते.
अखेर पुण्यातील जहांगीर रुग्णालयातील एका ब्रेनडेड रुग्णाचे हृदय मिळेल हे स्पष्ट झाले आणि डॉ. मुळे व त्यांचा चमू कामाला लागला. दात्याचे हृदय काढल्यापासून ते वेळेत रुग्णालयापर्यंत आणणे एक आव्हान होते. पुण्याहून हे हृदय हवाई रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात येणार होते. मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे तत्कालीन सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी ग्रीन कॉरिडॉरची चोख व्यवस्था केली होती. तब्बल १५० पोलीस ग्रीन कॉरिडॉरसाठी काम करत होते. अशा प्रकारची व्यवस्था एखाद्या शस्त्रक्रियेसाठी प्रथमच करण्यात आली होती. जवळपास पाच तास ही शस्त्रक्रिया सुरु होती.
मुंबईतील या यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात डॉ. मुळे यांनी ११० यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि आणि चार हजारांहून अधिक बायपास शस्त्रक्रिया केल्या. बदलापूर येथे राहाणाऱ्या सलीमला आज काय वाटते, असे विचारले, तेव्हा डॉ. मुळे यांनी मला नवे जीवन मिळवून दिल्याचे त्याने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 4:09 am